रेखा जरे यांच्या खुनाच्या तपासासाठी पाच पथके तैनात 

जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर 

अहमदनगर :

यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यकर्त्या रेखा जरे यांची गळा चिरून हत्या करण्यात आल्यानंतर पोलिसांनी तपासासाठी पाच पथकांची नियुक्ती केली आहे.  नगर-पुणे मार्गावरील जातेगाव घाटात ही घटना घडली.   रेखा जरे यांच्या आईंच्या  फिर्यादीवरून सुपा पोलिस ठाण्यात 302, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादीत त्यांनी हल्ला करणाऱ्या इसमाचे वर्णन सांगितले आहे. घटनेतील आरोपी 25 ते 30 वयोगटातील असून मोटर सायकल चालवणार्‍याने डार्क ब्राऊन रंगाचे लेदर जॅकेट, जीन्स व पायात स्पोर्ट शूज घातलेले होते.  त्याला दाढी व मिशी होती. दुसर्‍या आरोपीने काळ्या रंगाचे शर्ट, जीन्स तर पायात स्पोर्ट शूज व काळ्या रंगाचा गॉगल लावलेला होता.  या आरोपींच्या शोधासाठी पाच पथके तैनात करण्यात आली असल्याची माहिती पोलिस उपाधिक्षक विशाल ढुमे यांनी दिली.

पथकामध्ये स्थानिक गुन्हे शाखा, सुपा पोलिस ठाणे, पारनेर पोलिस ठाणे, एमआयडीसी पोलिस ठाणे आणि तोफखाना पोलिस ठाण्याच्या पथकांचा समावेश आहे.  जरे यांच्या खुन प्रकरणाने नगर जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. या घटनेचा विविध क्षेत्रातून निषेध व्यक्त करण्यात येत आहे.