जिल्हा न्यायालयात वकीलांनी केले संविधान पूजन

लोकशाही संरक्षण कायद्याचा मसुदा तयार करण्यासाठी सर्वच वकिलांची मदत घेण्याचा निश्‍चय

नगर (प्रतिनिधी)- येथील जिल्हा न्यायालयात अहमदनगर वकील संघाच्या वतीने संविधान दिनानिमित्त भारतीय संविधानाचे पूजन करुन संविधानाच्या उद्देशिकेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. उपस्थित वकील मंडळींनी लोकशाही संरक्षण कायद्याचा मसुदा तयार करण्यासाठी सर्वच वकिलांची मदत घेण्याचा निश्‍चय केला. तर भारतीय संविधान मध्ये वुई चा अर्थ आपण सर्व, आपणा सर्वांसाठी आणि आपल्या सर्वांचे गणतंत्र या स्वरूपात राबवण्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
वकील संघाचे उपाध्यक्ष ॲड. महेश शेडाळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या संविधान पूजन कार्यक्रमासाठी ॲड. सुरेश लगड, ॲड. कारभारी गवळी, ॲड. धनलक्ष्मी एस. नायडू, वकील संघाचे सचिव ॲड. संदीप शेळके, सहसचिव ॲड. संजय सुंबे, ॲड. गौरव दांगट, ॲड. रामेश्‍वर कराळे, ॲड. अरुण राशिनकर, ॲड. अंजन बचाटे, ॲड. भाऊ अवसरकर, ॲड. रवींद्र रणसिंग, ॲड. सागर निंबाळकर, ॲड. चंद्रशेखर उबाळे आदी उपस्थित होते.
भारतीय समाज सामाजिक आणि आर्थिक दृष्ट्या विभागलेल्या स्वरूपामध्ये गेले शेकडो वर्ष अस्तित्वात आहे. त्यातून महिलांना गेली अनेक वर्षे आणि अल्पसंख्याक समाजातील लोकांना देखील देशाच्या राजकारभारामध्ये पुरेशी संधी उपलब्ध होत नाही. इंग्लंडच्या अलिखित घटनेवर आधारित शासन पद्धती आज देखील भारतात लागू आहे. धर्म आणि राजकारणाचा वापर आम्ही, आमचे आणि आम्हाला यासाठी काही हितसंबंधी मंडळी करत आहेत. परंतु या सर्व बाबींचे रूपांतर आपण सर्व, आपणा सर्वांसाठी आणि आपल्या सर्वांचे मध्ये करण्यासाठी अहमदनगर वकील संघासह सर्व वकीलांची मदत घेण्याचा निर्णय आजच्या बैठकीत घेण्यात आला.
स्वातंत्र्योत्तर काळामध्ये भारतातील लोकशाही बौद्धिक दिव्यांग अजिबात असता कामा नये. भारतातील सर्व शासन- प्रशासन हे उन्नत चेतनेवर आधारित असले पाहिजे असा एकजुटीचा निर्णय देखील वकील संघाने घोषित केला. कोणत्याही धार्मिक किंवा पंथाच्या ग्रंथापेक्षा भारतीय संविधान सर्वश्रेष्ठ आहे. त्यामध्ये देशांमध्ये जात, धर्म, पंथ याला काही एक थारा न देता वकिलांनी त्यांना उपलब्ध असलेल्या आणि कायद्याने प्राप्त झालेल्या व्यापक अधिकाराचा वापर तमाम जनतेसाठी विशेषतः महिलांवरील अत्याचार दूर करण्यासाठी आणि दुबळ्या घटकांचे संरक्षण करण्यासाठी केला पाहिजे, असे देखील बैठकीमध्ये जाहीर करण्यात आले.
उपाध्यक्ष ॲड. महेश शेडाळे म्हणाले की, वकील संघ समाजावर होणारा अन्याय दूर करण्यासाठी प्रत्येक वेळेला पुढे राहणार आहे. या देशातील लोकशाही अधिक गतिमान, शक्तिमान आणि उन्नत करण्यासाठी आणि लोकशाही संरक्षण कायदा आणण्यासाठी वकीलांचा सक्रिय प्रयत्न राहणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली. यावेळी वकील संघाचे सचिव ॲड. संदीप शेळके यांनी लोकशाही संरक्षण कायद्याचा मसुदा तयार करण्यासाठी सर्वच वकिलांची मदत घेण्याचा निश्‍चय व्यक्त केला. ॲड. संजय सुंबे सचिव यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.