शेअर मार्केट ट्रेडींच्या नावाखाली फसवनूक करणाऱ्यांवर कारवाईची मागणी

पाथर्डीच्या पोलीस अधिकाऱ्यांना वंचित बहुजन आघाडीचे निवेदन

अहमदनगर – पाथर्डी आणि शेवगाव तालुक्यातील गोरगरीब, शेतकरी, शिक्षक, महिलांची शेअर मार्केट ट्रेडिंगच्या नावाखाली हजारो कोटींची फसवणूक झाली असून, फसवणूक करणाऱ्या व्यक्तींवर गुन्हे दाखल करून त्यांना तात्काळ अटक करावी, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष प्रा. किसन चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील यांना निवेदन देण्यात आले आहे. फसवणूक करणाऱ्या व्यक्तींच्या विरोधात तक्रारी न घेणाऱ्या शेवगाव पोलीस निरीक्षक आणि पोलीस कर्मचाऱ्यांच्या कामकाजाच्या विरोधात बुधवार (ता.७ऑगस्ट) रोजी आंबेडकर चौकामध्ये बेमुदत आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला आहे. तालुक्यात ठिकठिकाणी शेअर मार्केट ट्रेडिंग कार्यालय उघडली जात आहेत. शेतकरी, शिक्षक, महिला, व्यावसायिक, शेतमजुरांना १२ ते २५ टक्के परतावा देण्याचे अमिश दाखवत त्यातून हजारो कोटी रुपयांची फसवणूक करण्यात येत आहे. फसवणुकीनंतर फरार झालेल्या शेअर मार्केट ट्रेडिंग चालकाविरोधात त्वरित तक्रार दाखल करून त्यांना अटक करावी. शेवगाव पोलीस निरीक्षक व कर्मचारी अशा प्रकारेचे गुन्हे दाखल करण्यास टाळाटाळ करत असून, पोलीस निरीक्षकांचे व शेअर मार्केट चालकांचे हितसंबंध असल्याने लोकांची फसवणूक करणाऱ्यांवर गुन्हे दाखल होऊन त्यांना जाणीवपूर्वक वेगळे करण्यात येते. फरार झालेल्या ट्रेडर्स चालकांच्या नातेवाईकां जवळील व्यक्तींच्या नावावर असलेल्या स्थावर मालमत्ता केल्याची ही तक्रारी आहे. त्यामुळे फरार व्यक्तींचा शोध घेऊन त्यांना गजाआड करावे. फरार होण्यास मदत करणाऱ्या लोकांचाही शोध घेऊन त्यांनाही सहआरोपी करण्यात यावे. फारर झालेल्यां पैकी काहीजण आपल्या विरोधात तक्रार केली तर तुमचे पैसे मिळणार नाहीत. अशी ठेवीदारांना धमकी देत असल्याच्याही तक्रारी आहेत. असे असताना फरार लोक पोलिसांना का सापडत नाही असा प्रश्न प्रा. चव्हाण यांनी उपस्थित केला आहे. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष प्यारेलाल शेख, प्रीतम गर्जे, साईनाथ भागवत, गहिनीनाथ कातकडे, रवींद्र निळ, दत्ता औटी, अशोक कापरे, बाबासाहेब थोरात, सोपान काळे, सागर गरुड, वसंत औटी, सचिन कणसे, अवधूत केदार, सचिन शिंदे, अन्सार कुरेशी आदी उपस्थित होते.