अतिरिक्त पोलिस अधिक्षक संदिप मिटके बचावले.

घटनास्थळी जिल्ह्यातील पोलिस फौजफाटा मोठ्या प्रमाणावर उपस्थित.

ऋषिकेश राऊत 

अहमदनगर प्रतिनिधी  :- 

राहुरी तालुक्यातील आधार वेल फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा सौ. वैशाली नांन्नोर यांच्या घरात आज सकाळी गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. सुदैवाने या घटनेत अतिरिक्त पोलिस अधिक्षक संदिप मिटके हे बालंबाल बचावले. घटनास्थळी जिल्ह्यातील पोलिस फौजफाटा मोठ्या प्रमाणावर उपस्थित होता. त्यामुळे घटनास्थळाला पोलीस छावणीचे स्वरूप दिसून आले होते.

राहुरी तालूक्यातील डिग्रस येथील आधार वेल फाउंडेशन च्या संस्थापक अध्यक्षा सौ. वैशाली नान्नोर राहणार डिग्रस यांच्या राहत्या घरात रिव्हॉल्व्हर मधून दोन फायर झाल्याची घटना आज दिनांक ७ ऑक्टोबर रोजी सकाळी सात वाजता घडलीय. सौ. वैशाली नान्नोर यांनी ३० सप्टेंबर रोजी पुणे येथील बडतर्फ सहाय्यक पोलिस निरीक्षक सुनिल लक्ष्मण लोखंडे याच्या विरोधात श्रीरामपूर पोलिस ठाण्यात अपहरण व आर्म ॲक्टचा गुन्हा दाखल केला होता. त्याने आज वैशाली नान्नोर यांच्या घरात घुसून त्यांच्या अल्पवयीन मुलीला रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून ओलीस ठेवले होते. तर वैशाली नान्नोर यांनी दुसऱ्या रूममध्ये स्वतःला कोंडून घेतले होते. यावेळी त्यांनी पोलिस अधिकाऱ्यांना फोन करुन घटनेची माहिती दिली.

राहुरी येथील पोलिस निरीक्षक राजेंद्र इंगळे हे तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. आणि वरीष्ठ अधिकाऱ्यांना माहिती दिली. श्रीरामपूर येथील अतिरिक्त पोलिस अधिक्षक संदिप मिटके हे घटनास्थळी दाखल झाले. यावेळी आरोपी सुनील लोखंडे याने एका अल्पवयीन मुलीच्या डोक्याला रिव्हॉल्व्हर लावून ओलीस ठेवले होते. वैशाली नान्नोर यांनी माझ्यावर दाखल केलेला गुन्हा मागे घे. अशी त्याची मागणी होती. यावेळी संदिप मिटके यांनी त्याला बोलण्यात गुंतवले आणि त्याच्या हाताला झटका दिला. यावेळी रिव्हॉल्व्हर मधून दोन फायर झाले. मात्र सदर अल्पवयीन मुलगी व संदिप मिटके हे बालंबाल बचावले. त्यांनी ताबडतोब त्या मुलीची सुटका करून तिला घरातून बाहेर काढले. आणि आरोपीला ताब्यात घेतले. सिनेस्टाईल सुरू असलेला हा थरार सुमारे दोन तास सुरू होता. अशी माहिती समजली आहे. या घटनेमुळे जिल्ह्यात प्रचंड खळबळ उडाली होती.

घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलिस प्रमुख मनोज पाटील, अप्पर पोलिस अधिक्षक सौरभ अग्रवाल, सौ. दिपाली काळे, श्रीरामपूर विभागीय पोलिस अधिक्षक संदिप मिटके, शिर्डी विभागीय पोलिस अधिक्षक संजय सातव, स्थानिक गुन्हे शाखेचे अनिल कटके, श्रीरामपुर पोलिस निरीक्षक सानप, कोपरगाव येथील पोलिस निरीक्षक दौलतराव पवार, सहाय्यक पोलिस निरीक्षक समाधान पाटील आदि अधिकारी व पोलिस कर्मचारी मोठ्या संख्येने घटनास्थळी दाखल झाले. त्यामुळे डिग्रस गावाला पोलिस छावणीचे स्वरूप प्राप्त झाले होते.