‘या’ व्यक्तींनी कोव्हॅक्सिन घेऊ नये

कोव्हॅक्सिन लससंदर्भात गाईडलाईन जारी

 

नवीन वर्षाच्या सुरुवातीला ड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया (DCGI)ने आपात्कालीन वापरासाठी दोन कोरोना लसींना मान्यता दिली. एक सीरम इन्स्टिट्यूची ‘कोविशिल्ड’ आणि दुसरी भारत बायोटेकची ‘कोव्हॅक्सिन’. जेव्हा ‘कोव्हॅक्सिन’ लसीला मान्यता मिळाली तेव्हा अनेक आक्षेप घेत नाराजी व्यक्ती केल्याचे चित्र दिसले. ‘कोव्हॅक्सिन’ लसीची सुरक्षा, दर्जा, परिणामकारकता आणि माहिती यासंदर्भात पारदर्शकतेवरून प्रश्न उपस्थित करण्यात आले. भारत बायोटेक आणि सीरम इन्स्टिट्यूटमध्ये वाद देखील झाला. यावेळी भारत बायोटेकचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक असणाऱ्या कृष्णा एल्ला यांनी आपल्या कंपनीची लस २०० टक्के सुरक्षित असल्याचे म्हटले होते. त्यानंतर देशातील मोठ्या लसीकरणाच्या मोहीमेत सीरम इन्स्टिट्यूट आणि भारत बायोटेक एकत्र काम करतील असा कंपनीच्या सीईओने दावा केला. मग १६ जानेवारीपासून लसीकरणाच्या मोहीमेला सुरुवात झाली. पण आता भारत बायोटेकने कोणी कोव्हॅक्सिन घ्यावी यासंदर्भात गाईडलाईन प्रसिद्ध केली आहे.

कोणी लस घेऊ नये?

हैदराबादच्या भारत बायोटेक कंपनीने कोव्हॅक्सिन लससंदर्भात गाईडलाईन (फॅक्टशीट) जारी केल्या आहेत. यामध्ये विशिष्ट मेडिकल कंडिन्शन असलेल्यांनी ही लस घेऊ नये, अशा सूचना दिल्या आहेत. तसेच गरोदर महिला, किमोथेरिपीसारखे उपचार सुरू असलेले रुग्ण, एड्स रुग्ण आणि रक्त पातळ करण्यासाठी औषधाचे सेवन करणाऱ्या रुग्णांनी ‘कोव्हॅक्सिन’ घेऊन नये. ‘कोव्हॅक्सिन’ घेण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, असे भारत बायोटेकच्या नव्या गाईडलाईनमध्ये म्हटले आहे. तसेच भारत बायोटेकचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक असणारे कृष्णा एल्ला यांनी सांगितले की, ‘रोगप्रतिकारसंदर्भातील समस्या असणारे किंवा काही आजारांवर उपचार सुरू असणाऱ्यांनी सध्या ‘कोव्हॅक्सिन’ घेऊ नये.’ भारत बायोटेकच्या या गाईडलाईनमुळे सध्या देशातील लोकांमध्ये संभ्रम निर्माण होण्याची शक्यता आहे.