टायगर इज बॅक… लवकरच मैदानात, महेश गायकवाड यांच्या बॅनर्सची कल्याण-डोंबिवलीत चर्चा

भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांनी उल्हासनगर पोलिस स्टेशनमध्ये केलेल्या गोळीबारामुळे संपूर्ण ठाणे जिल्हा हादरला. या गोळीबारात शिवसेनेचे कल्याण विभाग शहर प्रमुख आणि माजी नगरसेवक महेश गायकवाड आणि त्यांचे सहकारी राहुल पाटील हे दोघेही गंभीर जखमी झाले. २ फेब्रुवारीला झालेल्या या हल्लानंतर तब्बल १४ दिवसांपासून महेश गायकवाड यांच्यावर ज्युपिटर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आता त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असून आज त्यांना डिस्चार्ज देण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे त्यांच्या कार्यकर्ते व समर्थकांमध्ये आनंदाचं वातावरण असून कल्याण पूर्वेत मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी करण्यात येत आहे.मृत्यूच्या दाढेतून परत आलेले महेश गायकवाड यांच्या स्वागतासाठी कल्याणमध्ये मोठ्या प्रमाणात बॅनर्स लावण्यात आले आहेत. ‘ गोर गरीबाचा कैवारी’… ‘टायगर इज बॅक’, हेच प्रेम हेच आशीर्वाद, जनतेचा रथ पुन्हा लवकरच मैदानात येणार, महेश गायकवाड कल्याणकर तुमचे स्वागत करीत आहोत अशा आशयाचे बॅनर सगळीकडे झळकत आहेत. तर दुसरीकडे महेश गायकवाड शहर प्रमुख, माजी नगरसेवक, भावी आमदार अशा आशयाचे बॅनरही काही ठिकाणी झळकत असल्याने राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.