पुढचा मुख्यमंत्री संख्याबळावर ठरणार नाही, कसा ठरणार सीएम? देवेंद्र फडणवीस यांच्या नव्या विधानाने महायुतीत खळबळ

महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री महायुतीचाच असेल. भाजपचं संख्याबळ जास्त असलं तरी संख्याबळाच्या आधारावर मुख्यमंत्री ठरणार नाही, असं वक्तव्य भाजप नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. त्यांच्या या नव्या विधानामुळे महायुतीमध्ये एकच खळबळ माजली आहे. एका कार्यक्रमादरम्यान देवेंद्र फडणवीस यांनी हे विधान केलं. महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण असेल, याबद्दल त्यांनी भाष्य केलं.देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होणार असे भाजपचे कार्यकर्ते म्हणत आहेत तर एकनाथ शिंदेच पुन्हा मुख्यमंत्री पद भूषणवतील असं शिंदे समर्थक म्हणत आहेत. अजित पवार गटातील नेते आणि सर्व कार्यकर्त्यांना ठाम विश्वास आहे की महाराष्ट्राचे पुढले मुख्यमंत्री हे अजित दादाच असतील. असं असताना राज्याचे पुढचे मुख्यमंत्री नेमके कोण होतील ? असं फडणवीस यांना विचारण्यात आलं. त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट उत्तर दिलं.राज्याचा पुढला मुख्यमंत्री हा महायुतीचाच असेल असे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं. संख्याबळ वगैरे असं आम्ही काही ठरवलेलं नाही. भाजपचे संख्याबळ तर सर्वात अधिकच असणार, याबद्दल कोणालाच शंका नाही. मात्र केवळ संख्याबळाच्या आधारावर राज्याचा मुख्यमंत्री ठरणार नाही. आम्ही तीन पक्ष एकत्र आहोत. याबद्दल वरिष्ठ नेते हे, तिनही पक्षांना विचारात घेऊन निर्णय घेतील असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.