काय आहे अजिंक्य गायकवाडची डेथ मिस्ट्री ????

एम एस ई बी च आहे अंजिक्यच्या मृत्यूस जबाबदार

 

अहमदनगर (संस्कृती रासने)

 

केवळ विजेच्या धक्क्याने मृत्यू झालेल्या अजिंक्य गायकवाडच्या मृत्यूचे गूढ आता उकलले आहे. त्याचा मृत्यू ११ के व्ही ओव्हर हेड वायरवरून आलेल्या केबल टी व्ही च्या वायरला चिकटून झाल्याचे समजतंय . तेव्हा त्याच्या मृत्यूला विनापरवानगी केबल टाकण्याची मुभा देणारे एम एस ई बी चे अधिकारी आणि केबल चालक जबाबदार आहेत तेव्हा त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हावा आणि शहरभर विजेच्या खांबावरून पसरलेले अनधिकृत धोकादायक इंटरनेट आणि टी व्ही केबलचे जाळे काढले जावे यासाठी आता जागरूक नागरिक मंच प्रयत्न करणार आहे. मंचाचे अध्यक्ष सुहासभाई मुळे हे यासाठी आग्रही आहेत.

 

हे ही पहा आणि चॅनेल सबस्क्राईब करा 

मिस्टर एशिया ‘किताब मिळवणारा  प्रसिद्ध शरीर षौष्ठव पटू  अजिंक्य गायकवाड याचा बुधवारी राहत्या घरी विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला. माजी नगरसेवक सुरेश गायकवाड यांचा मुलगा आणि हॉटेल दत्त चे मालक सामाजिक कार्यकर्ते दत्ता गायकवाड यांचे पुतणे अजिंक्य यांचा असा दुर्दैवी मृत्यू झाल्याने सर्वानी हळहळ व्यक्त केली. अवघ्या २९ वर्षीय अजिंक्यचा राहत्या घरी विजेचा किरकोळ धक्का बसून मृत्यू कसा होऊ शकतो याबाबत सर्वाना शंका होती. त्यादृष्टीने सर्वजण विचारणा आणि तपासणी करीत होते. याबद्दल सुरेश गायकवाड आणि त्यांच्या घरचे शोध घेत होते. त्यांच्या घरच्यांनी घटनास्थळाची पाहणी केली तेव्हा अजिंक्यचा मृत्यू नेमका कोणत्या कारणाने झाला ते त्यांना सापडले आहे. अजिंक्यच्या मृत्यूला एम एस सी बी आणि स्थानिक केबल किंवा इंटरनेटचे कनेक्शन देणारा चालकच जबाबदार आहे. असे त्यांना लक्षात आले आहे. याची माहिती कोतवाली पोलिसांना देण्यात आली. कोतवाली पोलीस ठाण्याचे निरीक्षक राकेश माणगावकर यांनी एम एस सी बी च्या अभियंत्यांना बोलावून घटना स्थळाचा पंचनामा करण्याचे आदेश देखील दिले आहेत. पण त्यावर अद्याप कार्यवाही झालेली नाही .

 

 

 

 

              घडले असे की , बुधवारी सायंकाळी ६ वाजता विजेचा शॉक बसून अजिंक्यचा मृत्यू झाला.  त्या दिवशी आणि आदल्या दिवशी  म्हणजे मंगळवारी दिवसभर आणि रात्रभर नगरमध्ये ढगफुटी झाल्यासारखा पाऊस कोसळत होता. बुधवारी देखील दिवसभर भिज पावसाची रिपरिप सुरूच होती . आणि या पावसात अजिंक्यच्या घरापर्यंत आलेल्या केबल ज्या इंटरनेट आणि केबल पुरवणाऱ्या होत्या त्या देखील भिजलेल्या होत्या . त्यातील एक केबल ही अजिंक्यच्या घरातपासून जवळच असलेल्या हाय टेन्शनच्या वायरवरून आलेली होती. ही केबल तेथील ११ के व्ही च्या डी पी मधून गेलेल्या वायरवरून स्थानिक केबल ऑपरेटरने टाकलेली असावी . ही केबल अजिंक्यच्या घरात खिडकीतून आतमध्ये आली. ज्यावेळी ही घटना घडली त्यावेळी पाऊस पडतच होता. आणि अजिंक्य घरी टी व्ही पाहात होता. त्यावेळी अचानक टी व्ही पाशी किंचित शॉर्ट सर्किट झाले म्हणून अजिंक्य टी व्हीला जोडलेली केबलची वायर तपासत होता. आणि याच वायर मध्ये ११०० किलो व्हॅट चा करंट उतरलेला होता. दुर्दैवाने अजिंक्यने या वायरल हात लावला आणि अजिंक्यला हा जोराचा विजेचा धक्का बसला तेव्हा तो ही वायर ज्या खिडकीतून घरात आली होती त्या खिडकीच्या ग्रीलला चिकटला . आणि जागेवरच तो कोसळला . अजिंक्यचा हात ज्या ग्रीलला चिकटला होता तेथे अजिंक्यच्या बोटांचे मास आढळले . त्यावरून घरच्यांनी ही वायर तपासली तर त्या केबलच्या वायरमध्ये करंट होता. आणि ही वायर कोठून आली याचा त्यांनी शोध घेतला त्यात हाय टेन्शन केबल वरून आलेल्या वायरचा खुलासा झाला.

 

नगर शहरात शेकडो किलोमीटर केबल अशाच प्रकारे धोकादायक पद्धतीने टाकण्यात आलेली आहे. स्थानिक केबल नेटवर्क आणि इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडर कंपन्याचे वायरमन या केबल टाकण्यासाठी एम एस ई बी आणि पथदिव्याचा आधार घेतात . त्यामुळे हा मृत्यूचा सापळा घराघरात पोहोचलेला आहे. या वायरींचे शॉक अनेकांना बसले असतील पण ते किरकोळ किंवा माध्यम स्वरूपाचे असल्याने त्याची फारशी गंभीर दाखल कोणीही घेतली नसावी पण आता हा प्रकार अजिंक्यच्या जीवावरच बेतला मग याची चर्चा सुरु झाली. हा विषय जेव्हा जागरूक नागरिक मंचाचे अध्यक्ष सुहासभाई मुळे यांना समजला तेव्हा त्यांनी याची गंभीरता ओळखून या घटनेला सर्वस्वी एम एस ई बी , महानगर पालिकेचे अधिकारी आणि कर्मचारी जबाबदार आहेत. तसेच स्थानीक केबल चालक आणि इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडर कंपन्या जबाबदार आहेत. त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हावा अशी मागणी त्यांनी केली आहे. यासाठी ते पाठपुरावा करणार आहे. हा गुन्हा दाखल होण्याने अजिंक्य परत येणार नाही पण अशा घटनेची पुनरावृत्ती परत होऊ नये आणि शहर भर विजेच्या खांबावरून पसरलेले धोकादायक केबलचे जाळे काढले जाईल आणि अनेकांचे जीव वाचतील हा त्यामागचा उद्देश आहे.