घंटा गाडी चालक सुका कचरा विकतो कचरा वेचकांच्या पोटावर पाय

 नगर – शहरातील व उपनगरातील कचरा संकलन करणार्या घंटागाडीवरील चालक हा सुका कचरा गोळा करुन तो विकत असल्याची तक्रार कागद, काच, पत्रा कष्टकरी पंचायतीचे समन्वयक विकास उडाणशिवे यांनी केली आहे.

     घंटागाडीवरील वाहन चालकाची ही कृती कागद, काच, पत्रा वेचक कष्टकरी महिलांचा रोजगार हिसकावून घेण्याचा प्रयत्न असून, यामुळे, झोपडपट्टी, गलिच्छ वस्तीत राहणारे कचरा वेचकांवर उपासमारीची वेळ आली आहे. वास्तविक घंटागाडीवरील वाहन चालकांना हक्काचा पगार असूनही त्यांनी स्वत: सुका कचरा गोळा करुन तो विकावा ही बाब दुर्लक्षित करण्यासारखी नसून, संबंधित वाहन चालकांवर कारवाई करावी, अशी मागणी श्री.उडाणशिवे यांनी केली.

     नगर शहर हद्दीतील कचरा संकलनात कचरा वेचकांना सहभागी करुन घेणे व सदरील  कचरा वेचण्याकरीता एक वर्ष अनुमती देण्यात येत आहे, असे पत्र मनपा प्रशासनाने कचरा वेचक पंचायतीला दिले आहे. असे असतांना कचरा वेचकांना घंटागाडीवरील सुका कचरा संकलनासाठी घंटागाडीवरील वाहन चालकांनी सहकार्य न करता स्वत: सुका कचरा गोळा करुन तो विकवा म्हणजे रक्षकच भक्षक बनावा, अशी गंभीर बाब आहे.

     या घटनेकडे गांभिर्याने लक्ष देऊन संबंधित वाहन चालकांविरोधात कारवाई व्हावी अशी अपेक्षा व्यक्त करुन  महापालिकेने कचरा वेचकांना ठरल्याप्रमाणे ओळखपत्र देण्यात यावे.  कचरा वेचकांना घंटागाडीवर सुका कचरा वेचण्याकरीता म.न.पा.ने अनुमती दिली आहे. त्याची अंमलबजावणी करावी, कचरा वेचक आणि कचरावेचक पंचायत याबाबत महापालिका प्रशासनाला सहकार्य देतील, असे श्री.उडाणशिवे यांनी पत्रकात म्हटले आहे.