पन्नास हजार बेघरांचा जमीनीचा प्रश्‍न सोडविल्याबद्दल खासदार इम्तियाज जलील यांना घरकुल वंचित देणार उन्नत शिवचेतना रत्न मानवंदना

अहमदनगर शहरातील घरकुल वंचितांच्या घरांचा प्रश्‍न सोडविण्यासाठी जागा मिळण्याचा आग्रह

पन्नास हजार बेघरांचा जमीनीचा प्रश्‍न सोडविल्याबद्दल औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांना नगरमध्ये मेरे देश में मेरा अपना घर आंदोलनाच्या वतीने उन्नत शिवचेतना रत्न मानवंदना देण्यात येणार आहे. तर बेघरांच्या प्रश्‍नाकडे दुर्लक्ष करणार्‍या लोकप्रतिनिधी विरोधात डिच्चू कावा तंत्र राबविण्याचा आग्रह धरण्यात येणार असल्याची माहिती अ‍ॅड. कारभारी गवळी यांनी दिली.

आपलं राज्य आणि आपलं कार्य या दोन्ही बाबतीत औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यशस्वी झाले आणि औरंगाबाद शहरातील पन्नास हजार बेघरांसाठी औरंगाबादचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्याकडून 50 एकर जमीन मिळविण्यात त्यांना यश आहे. जलील हे देशातील पहिले खासदार आहेत, की त्यांनी पन्नास हजार बेघरांसाठी पंतप्रधान आवास योजनेसाठी 50 एकर जमीन मिळवली आहे. तिसगाव, हरसुल, पडेगाव (जि. औरंगाबाद) मध्ये ही 50 एकर जमीन मिळाली आहे. खासदार इम्तियाज जलील यांनी संसदेत बेघरांचा प्रश्‍न लावून धरला आणि त्यातून औरंगाबादचे जिल्हाधिकारी यांना संसदेच्या स्थायी समितीसमोर जबाब देण्यासाठी बोलावण्यात आले. त्यामुळे जिल्हाधिकार्‍यांनी तातडीने 50 एकर जमीन बेघरांसाठी मंजूर केली. अनेक वर्षानंतर मोठ्या प्रमाणात बेघरांसाठी सरकारी जागा उपलब्ध झाली असून, घरकुल वंचितांचा प्रश्‍न पोटतिडकीने सोडविल्याबद्दल जलिल यांचा सन्मान करण्याचे संघटनेने ठरविले असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

2015 पासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरात प्रधानमंत्री आवास योजना लागू केली. परंतु लोकप्रतिनिधी आणि नोकरशाही याबाबत निष्क्रिय राहिले. अहमदनगर महापालिका हद्दीत वीस हजार घरकुल वंचितांची यादी मंजूर आहे. पण एकाला देखील आजपर्यंत घर मिळालेले नाही. 2022 आखेर पर्यंत देशभरातील बेघरांना निवारा देण्याचे आश्‍वासन केंद्र सरकारने दिले होते. महाराष्ट्र सरकार मधील माजी गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता, राधाकृष्ण विखे-पाटील आणि सध्याचे गृह निर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांना घरकुल वंचितांचा प्रश्‍न सोडविता आलेला नसल्याचे म्हंटले आहे.

मतदारांची मते खरेदी करून तसेच जात आणि धर्माचा वापर करून मागच्या दाराने सत्तेत आलेल्या लोकप्रतिनिधींनी फक्त संस्थाने सांभाळली आणि कुटुंबाचे भले केले. त्यामुळे औरंगाबादचे खासदार जलील यांचे कार्य उन्नत शिवचेतनेप्रमाणे सर्वसामान्यांच्या हितासाठी ठरले आहे. खासदार जलील यांना देशभरातील तमाम घरकुल वंचितांच्या वतीने अभिवादन करण्यात येत आहे. सर्व सत्ताधार्‍यांनी स्वातंत्र्योत्तर काळात स्वत:चे हित साधून समाजवाद मोडीत काढला. आर्थिक आणि सामाजिक न्याय दुर्बल घटकांना मिळू दिला नाही. त्यामुळे गरिबी व बेकरी हटवा फक्त घोषणा ठरलेल्या आहेत. गरिबी व बेकरी हटविण्यासाठी बेघरांना घरे मिळणे आवश्यक असून, अहमदनगर शहरातील घरकुल वंचितांच्या घरांचा प्रश्‍न सोडविण्यासाठी जागा मिळण्याचा आग्रह संघटनेच्या वतीने धरण्यात आला आहे. या कार्यक्रमासाठी अशोक सब्बन, कॉ. बाबा आरगडे, यमनाजी म्हस्के, जालिंदर बोरुडे, पै. नाना डोंगरे, विजय भालसिंग, वीरबहादूर प्रजापती, प्रकाश थोरात, हिराबाई ग्यानप्पा, अ‍ॅड. गवळी, सुधीर भद्रे, शाहीर कान्हू सुंबे, बाळासाहेब गायकवाड, विठ्ठल सुरम, अशोक भोसले आदी प्रयत्नशील आहेत.