ईपीएस 95 राष्ट्रीय समन्वय समितीच्या प्रतिनिधींना दिल्लीला बैठकीसाठी आमंत्रण

भारत सरकारच्या कामगार स्थायी समितीने ईपीएस 95 पेन्शनर्सची पेन्शन वाढ व इतर मागण्यांवर तोडगा काढण्यासाठी दिल्ली येथे गुरुवारी (दि.20 एप्रिल) आयोजित केलेल्या बैठकीसाठी निवृत्त कर्मचारी 1995 राष्ट्रीय समन्वय समिती (नागपूर) च्या दोन प्रतिनिधींना आमंत्रित करण्यात आले असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य पेन्शनर्स संघटनेचे सरचिटणीस सुभाष कुलकर्णी यांनी दिली.
भारत सरकारच्या कामगार स्थायी समितीने निवृत्त कर्मचारी 1995 राष्ट्रीय समन्वय समितीचे जनरल सेक्रेटरी प्रकाश पाठक यांना पत्र देऊन बैठकीला दोन प्रतिनिधींना आमंत्रित केले आहे. तर या पत्रात समन्वय समितीचे पेन्शन बाबतचे म्हणणे 10 एप्रिल पर्यंत पाठविण्याबाबतही अतिरिक्त संचालकांनी कळविले आहे.
7 एप्रिल रोजी नागपूर येथे प्रकाश पाठक यांनी बैठक आयोजित केली होती. त्या बैठकीत प्रकाश येंडे व दादा झोडे या दोन प्रतिनिधींना 20 एप्रिलच्या बैठकीत पाठविण्याचा सर्वानुमते निर्णय झाला असून, दोन्ही प्रतिनिधी या बैठकीला जाणार असल्याचे संघटनेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.
महाराष्ट्र राज्य पेन्शनर्स संघटना ईपीएस 95 राष्ट्रीय समन्वय समितीशी संलग्न काम करत आहे. मागील 12 वर्षापासून पेन्शन वाढच्या प्रश्‍नावर संघटनेचा केंद्र सरकारशी पाठपुरावा सुरु आहे. संघटनेने शिर्डी येथे सन 2013 मध्ये केंद्रीय कामगार मंत्री दत्तात्रय बंडारु यांना निमंत्रित करून पेन्शन मेळावा घेतला होता. तेव्हापासून आज पर्यंत संघटनेने वेळोवेळी आंदोलने, मोर्चे व सातत्याने करत असलेल्या पाठपुराव्याला यश येताना दिसत आहे. 20 एप्रिलची बैठक झाल्यानंतर महाराष्ट्र राज्य पेन्शन संघटनेच्या वतीने श्रीरामपूर येथे 30 एप्रिल रोजी मेळावा घेऊन दिल्ली येथे झालेल्या बैठकीची सविस्तर माहिती देण्यात येणार असल्याचे संघटनेच्या वतीने जाहीर करण्यात आले आहे. पेन्शनर्सचा प्रश सोडविण्यासाठी संघटनेचे अध्यक्ष एस.एल. दहिफळे, उपाध्यक्ष बाबुराव दळवी, ज्ञानदेव आहेर, सचिव भागीनाथ काळे प्रयत्नशील आहेत.