एसटी रथाद्वारे 75 वर्षांचा इतिहास उलगडणार

शनिवारी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार उद्घाटन; जिल्ह्यातील प्रत्येक गावापर्यंत धावणार रथ

ग्रामीण भागापासून शहरापर्यंत लाडक्या लाल परीने 75 वर्ष अविरत सेवा दिली आहे. अमृत महोत्सव साजरा करताना सुरक्षित प्रवासासाठी प्राधान्य असलेल्या एसटीला 75 वर्षांचा भव्य इतिहास आहे. अनेक चढ उतार येत असताना दुसऱ्या बाजूला एसटी महामंडळात होणारे नाविन्यपूर्ण बदल आणि नवीन संकल्पनांचे फिरते प्रदर्शन खेड्यापासून शहरापर्यंत पोहोचवण्यासाठी महामंडळाकडून एसटी रथ तयार करण्यात आला आहे.
या रथाचे उद्घाटन शनिवार ३ जून रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे. नंतर हा चित्ररथ संपूर्ण महाराष्ट्रातील प्रमुख बसस्थानकांवर नेण्यात येणार असून त्या बसस्थानकाच्या परिसरातील सर्वसामान्य नागरिक विशेषतः शालेय विद्यार्थ्यांना बघण्यासाठी खुला करण्यात येणार आहे. महाराष्ट्राच्या रस्त्यावर पहिली एसटी बस एक जून 1948 रोजी धावली. किसन राऊत हे एसटी बसचे पहिले चालक तर लक्ष्मण केवटे हे एसटीचे पहिले वाहत होते. पहिल्या लाल परीला लाकडी बॉडी आणि वरून कापडी छप्पर होते. काळानुरूप बदलानुसार साधारण लालपरी पासून ई एसटी बसेस् पर्यंत एसटीचा प्रवास येऊन ठेपला आहे. आता याच प्रवासाला 75 वर्षे पूर्ण झाली आहेत. याच पार्श्वभूमीवर एसटीचा इतिहास सांगणारा रथ, एसटी महामंडळाकडून तयार करण्यात आला आहे.