नगर-कल्याण रोड येथील श्रीकृष्ण नगरच्या अंतर्गत रस्त्यांचे काम निकृष्ट

स्थानिक नागरिकांचा महापालिकेत आंदोलन करण्याचा इशारा

नगर-कल्याण रोड, प्रभाग क्रमांक 8 मधील श्रीकृष्ण नगरचे अंतर्गत रस्त्याचे काम निकृष्ट होत असल्याचा आरोप  युवासेनेचे शहर प्रमुख महेश लोंढे व स्थानिक नागरिकांनी केला आहे. ठेकेदार हा कामात हलगर्जीपणा करत असून, या कामाची गुणवत्ता तपासणी करुन दर्जेदार काम करण्याची मागणी नागरिकांच्या वतीने मनपा आयुक्तांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. अन्यथा  स्थानिक नागरिकांचा महापालिकेत आंदोलन करण्याचा इशारा .
श्रीकृष्ण नगर येथे अंतर्गत रस्त्याचे कामे सुरू आहेत. सदरचे काम निकृष्ट दर्जाचे सुरू आहे. रस्ता मजबुतीकरण कामासाठी वापरण्यात येणारा मुरूम हा माती मिश्रीत असल्याने स्त्याची मजबुती ही जास्त काळ टिकू शकणार नाही. रस्त्यावर पाणी न मारता रोलर फिरवला जात आहे. या निकृष्ट कामामुळे हा रस्ता अधिक काळ टिकणार नसल्याचे निवेदनात म्हंटले आहे.
सदर रस्त्याचे काम इस्टिमेटनुसार होत नसल्याचाही आरोप नागरिकांनी केला आहे. नागरिकांनी सुरु असलेल्या रस्त्याच्या निकृष्ट कामाची पहाणी केली. यावेळी महेश लोंढे यांच्यासह नामदेव चौधरी, तुळशीदास रावळे, टीनू थॉमस, शोभा बोडखे, लक्ष्मी मानकर, सतीश लोढा, विनायक नाटाळे, प्रियंका अनमल, निलेश आंबेकर, अशोक काकळीज, भाऊसाहेब भातणकर, ऋषीकेश सैदर, अभिजीत शिंदे आदींसह प्रभागातील नागरिक उपस्थित होते.