रुईछत्तीशी येथील बोगस डॉक्टराविरुद्धा गुन्हा कारवाई बाबत निवेदन

जन आधार सामाजिक संघटनेच्या वतीने जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन

रुईछत्तीशी ता.नगर येथिल शंकर फुलमाळी यांच्या 19 वर्षीय मुलीला बाळातपणासाठी रुग्णालयात दाखल केले असता मुलीचा व तिच्या पोटात असणाऱ्या बाळाचा चुकीच्या पद्धतीने केलेल्या उपचारामुळे दुर्दैवी मृत्यू झाला.  तिला बाळंतपणातील त्रास जाणू लागल्यामुळे तिला गावातीलच असणाऱ्या डी.बी. बोस या खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्या ठिकाणी तिच्यावर चुकीच्या पद्धतीने केलेल्या उपचारामुळे तिचा व तिच्या पोटात असणाऱ्या बाळाचा मृत्यू झाला.

त्यानंतर डी.बी.बोस रुग्णालयाचा तथाकथित डॉ. ज्ञानेश्वर निवृत्ती पवार याची तालुका आरोग्य अधिकाऱ्यांमार्फत चौकशी झाल्यानंतर त्याची वैद्यकीय सनद न आढळल्या मुळे त्याला बोगस डॉक्टर म्हणून घोषित करण्यात आले.  त्याच्यावरती नगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

जेवढा हा बोगस डॉक्टर यात आरोपी म्हणून महत्वाचा वाटतो.  तेवढीच जबाबदारी अशा बोगस डॉक्टरवर किंवा दवाखान्यावर नियंत्रण ठेवत असलेल्या शासकीय यंत्रणेची देखील असते.  जिल्हा परिषदेचे आरोग्य अधिकारी व तालुका आरोग्य अधिकारी तसेच नगर तालुका पंचायत समिती  यांच्यावर देखील सदोष  मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी जनआधार सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश पोटे यांनी जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. कार्यक्षेत्रात असणाऱ्या प्रत्येक वैद्यकीय ओ.पी.डी. तसेच दवाखाने यांच्यातील डॉक्टर्स विषयी माहिती आणि त्यांच्या सनद यांच्या विषयी माहिती ठेवणे हे बंधनकारक आहे.

रुईछत्तीशी या ठिकाणी हायवे लगतच पत्र्याच्या शेडमध्ये डी.बी बोस या नावाने मागील 25 ते 30 वर्षांपासून हे बोगस रुग्णालय सुरू होते.

या बोगस हॉस्पिटलचा चालक ज्ञानेश्वर निवृत्ती पवार यांचे आणि आरोग्य अधिकारी याचे काही लागेबांधे होते का? या गोष्टीची चौकशी व्हायला हवी.  या मुलीच्या मृत्यूस जेवढा हा बोगस डॉक्टर जबाबदार आहे, तेवढीच त्याला दुर्लक्षित करणारी जिल्हा आरोग्य यंत्रणा जबाबदार धरून त्यांच्या वर मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करावेत आणि त्या निष्पाप मुलीला आणि तिच्या बाळाला न्याय मिळवून देण्याची मागणी जनआधार सामाजिक संघटनेच्या वतीने निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.