सामाजिक संदेशाचे चित्र रेखाटणारे कलाकार “निसार पठाण” यांचा सन्मान

तोफखाना येथील  पोलीस स्टेशनने पुढाकार घेऊन पोलीस स्टेशनच्या भिंतीवर सामाजिक संदेश देणारे चित्र रंगविण्यात आले आहेत. पोलीस निरीक्षक ज्योती गडकरी यांच्या संकल्पनेतून या कलाकृती साकारण्यात आल्या आहेत. या कलाकृती आपल्या कुंचल्यातून जिवंत करणारे निसार पठाण यांचा गडकरी यांनी सन्मान करुन त्यांच्या कलाकृतीचे कौतुक केले.
‘भिऊ नकोस मी तुझ्या पाठिशी!’ ,  हा भिंतीवर संदेश देणारा चित्र सर्वांचे लक्ष वेधत आहे. ‘महिला पोलीस एका युवतीला धीर देताना’  दिसत आहे. तर ‘सार्वजनिक स्वच्छतेसह’ विविध सामाजिक संदेश देणारे चित्र भिंतीवर पठाण यांनी साकारले आहे.
हरहुन्नरी कलाकार असलेले निसार पठाण यांनी शहराच्या डिएसपी चौकातील पाण्याच्या टाकीवर देखील शंभर फुट उंचीवर सिटीबर्ड व महात्मा गांधी यांचे चित्र रेखाटलेले आहे. पठाण हे भित्तीचित्र रेखाटण्यासाठी राज्यभरात प्रसिध्द असून, त्यांनी राज्यभर विविध व्यापारी कंपन्यांच्या जाहीराती भिंतीवर रंगविल्या आहेत. तसेच वाडियापार्क क्रीडा संकुल येथे देखील शहराच्या ऐतिहासिक वास्तूंचा ठेवा त्यांनी रेखाटला आहे. त्यांनी काढलेली चित्रे इतकी हुबेहुब असतात की, हात लावून पहाण्याचा मोह आवरत नाही.

तर पोलीस निरीक्षक गडकरी यांचे व्यक्तिचित्रण केलेले पेन्सिलचे स्केच पठाण यांनी त्यांना भेट दिले. हे चित्र पाहून गडकरी अक्षरश: भारावल्या व त्यांच्या कलेला दाद दिली.