14 मार्चच्या बेमुदत संपासाठी जिल्ह्यात तयारी सुरु……..

शहरासह संपूर्ण जिल्ह्यात तालुका पातळीवर हा संप यशस्वी करण्यासाठी नियोजन

१४ मार्च रोजी तालुका पातळीवर सर्व संघटनेचे पदाधिकारी व कर्मचारी सकाळी १० :३० वाजता तहसिल कार्यालया समोर निदर्शने करणार आहे.जुनी पेन्शन व जिव्हाळ्याच्या प्रलंबित मागण्यांसाठी सरकारी, निमसरकारी, शिक्षक-शिक्षकेतर, महापालिका, नगरपालिका, नगरपरिषदा, नगरपंचायत कर्मचारी ,समन्वय समितीने १४ मार्च पासून राज्यव्यापी बेमुदत संपाची हाक दिली आहे.

या पार्श्‍वभूमीवर संपाच्या नियोजनासाठी सिंचन भवन येथील राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या कार्यालयात सरकारी कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी व शिक्षक संघटनेच्या नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीत शहरासह संपूर्ण जिल्ह्यात तालुका पातळीवर हा संप यशस्वी करण्यासाठी नियोजन करण्यात आले आहे. या बैठकीत सर्व शिक्षक, शिक्षकेतर व सरकारी, निमसरकारी कर्मचारी पूर्ण ताकतीने संपात सहभागी होण्याचा निर्धार व्यक्त करुन संपाचे नियोजन करण्यात आले. तर संपाच्या भिंतीपत्रकाचे अनावरण करण्यात आले.

समन्वय समितीचे निमंत्रक रावसाहेब निमसे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीसाठी मध्यवर्ती संघटना अहमदनगर शाखेचे अध्यक्ष सुभाष तळेकर, माध्यमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष अप्पासाहेब शिंदे, शिरीष टेकाडे, राजेंद्र खेडकर, महेंद्र हिंगे, भाऊसाहेब जिवडे, पी.डी. कोळपकर, विजय काकडे, शिक्षक परिषदेचे राज्य अध्यक्ष सुनील पंडित, शिक्षक परिषदेचे नेते बाबासाहेब बोडखे, सुरेश जेठे, निवृत्ती इले, दगडू मोरे, एम.बी पुंड, बी.व्ही तोरमल, एस.बी. काळे आदी उपस्थित होते.  शासनाने जास्त वेळ सरकारी कर्मचारी, शिक्षक यांची प्रश्‍ने प्रलंबीत न ठेवता मार्ग काढण्याची गरज होती. त्यांचे प्रश्‍न व मागण्यांकडे सरकारने दुर्लक्ष केल्याने कर्मचारी, शिक्षकांच्या मनात असंतोष निर्माण झाला आहे.