सातव्या वेतन आयोगाबाबतची मुंबईतील बैठक पुन्हा रद्द
महापालिका कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्याच्या प्रश्नाबाबत मुंबई येथे सोमवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आलेली बैठक रद्द करण्यात आली. यापूर्वीही उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे बैठक होणार होती. मात्र ती ही रद्द झाली होती. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संभाव्य मुंबई दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर बैठक रद्द झाल्याचे सांगण्यात आले आहे. कर्मचाऱ्यांच्या सातव्या वेतन आयोगाच्या प्रश्नांसह इतर मागण्यांसाठी कामगार युनियन नगर ते मुंबई लॉंग मार्च काढला होता. यावेळी आमदार संग्राम जगताप यांनी मुंबई येथे बैठकीचे आयोजन करून तोडगा काढण्याचा आश्वासन दिले होते. त्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले होते. उपमुख्यमंत्री पवार यांच्या उपस्थितीत यापूर्वी ही बैठकीचे आयोजन करण्यात आले होते, मात्र अद्यापही ही बैठक झालेली नाही 4 डिसेंबर रोजी सातवा वेतन आयोगाच्या प्रश्नासह शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची उंची वाढवणे, नगर शहर आणि बुरुड गाव परिसरातील सीना नदी पात्राची रुंदी वाढवणे आणि खोलीकरण करण्यासाठी निधी उपलब्ध करणे यासाठी बैठक आयोजित करण्यात आली होती. मात्र ही बैठकही रद्द करण्यात आल्याचे शुक्रवारी समोर आले आहे.