भाविकांच्या दिंडीत भरधाव वेगाने आलेला कंटेनर घुसल्याने भीषण अपघात – चालकास अटक
घारगाव सातवा मैल जवळ घडला भिषण अपघात. तिघे जागीच ठार झाल्याची व ९ जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
नाशिक- पुणे महामार्गावरून विठ्ठल नामाचा आणि साईनाथाचे नामस्मरण करत शिर्डीवरून आळंदीला जाणाऱ्या भाविकांच्या दिंडीत भरधाव वेगाने आलेला कंटेनर घुसल्याने भीषण अपघाताची घटना आज रविवारी सायंकाळी साडे चार वाजेच्या सुमारास घडली. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार या अपघातात तीन वारकरी जागीच ठार झाले तर नऊ वारकरी जखमी झाले. दरम्यान या अपघाताला कारणीभूत असणारा ट्रक क्रमांक (MH 12 VT 1455) वरील चालक दारू पिलेला असल्याचे व त्याला डुलकी लागली असल्याचे प्रत्यक्षदर्शींच वारकऱ्यांचे म्हणणे आहे.या अपघातातील मृत्यू पावलेल्या वारक-यांची अद्याप ओळख पटली नसून कंटेनर चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तर संतप्त नागरिकांनी या कंटेनरची तोडफोड केली. दरम्यान आजूबाजूच्या नागरीकांनी तात्काळ मदत करत जखमींना आळेफाटा येथील रुग्णालयात दाखल केले आहे. या अपघातात वारकरी ठार झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
घारगाव येथील नांदूर खंदरमाळ फाटा सातवा मैल येथे झालेल्या अपघातातील जखमींना तातडीने मदत करण्याच्या सूचना काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते तथा माजी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी स्थानिक सर्व कार्यकर्ते व पदाधिकारी यांचं प्रशासनाला केल्या असून तातडीने मदत करत आहे.
साखर कारखाना, दूध संघ यांच्यासह पठार भागातील कार्यकर्त्यांनी तातडीने जखमींना मदत पोहोचून वारक-यांना दिलासा दिला आहे. जखमींना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले आहे. याबाबत आमदार थोरात यांनी तातडीने सर्वांशी संपर्क साधून प्रशासनालाही याबाबत सतर्क राहून मदतीच्या सूचना केल्या आहेत.
यशोधन कार्यालय व संपर्क यंत्रणेने सर्व भाविकांच्या नातेवाईकांची संपर्क साधून त्यांना याबाबतची माहिती दिली तसेच दिडीतील सर्वांना मदत करत मोठा दिलासा दिला आहे.
अपघाताची ही घटना अत्यंत दुर्दैवी असून या घटनेतील वारकऱ्यांच्या निधनाने तीव्र दुःख झाले असून या सर्व वारकऱ्यांच्या परिवारावर मोठे संकट कोसळले आहे. या सर्व परिवारांच्या दुःखात आपण सामील असून सर्वतोपरी मदत केली जाईल असेही आमदार थोरात यांनी म्हटले आहे.