ब्राह्मणीच्या छत्रपती शाहू महाराज निवासी वस्तीगृहात स्वातंत्र्य दिवस उत्साहात साजरा
विद्यार्थ्यांनी देशभक्तीवर सादर केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमाने ग्रामस्थ भारावले देशभक्तीवर गीते, भाषणे, नाटिका व सांस्कृतिक कार्यक्रमाचे सादरीकरण
अहमदनगर (प्रतिनिधी)- गरजू व निराधार विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी कार्यरत असलेल्या ब्राह्मणी (ता. राहुरी) येथील छत्रपती शाहू महाराज निवासी वस्तीगृहात 78 वा स्वातंत्र्य दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांनी देशभक्तीवर सादर केलेल्या विविध कार्यक्रमांनी उपस्थितांची मने जिंकली. देशभक्तीवर गीत, भाषणे, नाटिका व सांस्कृतिक कार्यक्रमाने ग्रामस्थ भारावले.
प्रारंभी वस्तीगृहात ध्वजारोहण करुन तिरंगा ध्वज फडकविण्यात आला. तर महापुरुषांच्या प्रतिमांना अभिवादन करुन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी ब्राह्मणीचे सरपंच सुवर्णा सुरेश बानकर, ग्रामपंचायत सदस्या प्रियंका आंबेडकर, नाथपंथी गोसावी समाज अध्यक्ष सर्जेराव शेगर, नाथपंथी डवरी गोसावी समाज उपाध्यक्ष उत्तम शिंदे, वस्तीगृह संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मोहन शिंदे, उपाध्यक्ष शिवाजी शेगर, सचिव अनिल सावंत, वस्तीगृह अधीक्षक रोहित सावंत, संजय सावंत, नामदेव शिंदे कृष्णा शिंदे, संतोष चव्हाण, विजय शेगर, बाबाजी सावंत, सागर सावंत, करण शेगर, विशाल शेगर, तानाजी सावंत, शिवाजी शिंदे, करण शिंदे, सागर शिंदे आदींसह ग्रामस्थ, शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी विद्यार्थ्यांनी देशभक्तीवर गीते, भाषणे, नाटिका व सांस्कृतिक कार्यक्रमाचे सादरीकरण केले. उपस्थित पालक व परिसरातील नागरिकांनी विद्यार्थ्यांच्या कलागुणांना टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिली.
छत्रपती शाहू महाराज निवासी वस्तीगृहात 58 निराधार मुले-मुली शिक्षण घेत आहेत. ही संस्था विनाअनुदानित तत्त्वावर चालत असून, समाजातील दानशूर व्यक्ती व लोकवर्गणीतून या मुलांचे पालनपोषण व शिक्षणाचा खर्च भागवला जात असल्याची माहिती संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मोहन शिंदे यांनी दिली.