राष्ट्रवादीचे आ.निलेश लंकेंची काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळेंनी घेतली भेट.

लंके यांच्या हस्ते काळे यांचा सत्कार ; काळेंना राजकीय वाटचालीसाठी दिल्या शुभेच्छा

अहमदनगर (वैष्णवी घोडके)

नगर शहरामध्ये विखे-जगताप राजकीय सहमती एक्सप्रेस सुरू आहे. भाजप खा. सुजय विखे यांनी स्वतः नगर शहरात काही दिवसांपूर्वी झालेल्या कार्यक्रमात याबद्दल भाष्य केले होते. यावेळी त्यांनी आ. निलेश लंके यांच्यावर नाव न घेता टीका देखील केली होती. नगर शहराचे राष्ट्रवादीचे आ. संग्राम जगताप आणि पारनेरचे आ.लंके या दोघांमध्ये देखील फारसे सख्य नसल्याची चर्चा सतत सुरू असते. अशातच आता नगर शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी नुकतीच राष्ट्रवादीचे आ.निलेश लंके यांची सदिच्छा भेट घेतल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

 

 

आ.लंके यांच्या हंगा येथील कार्यालयात ही भेट झाली. यावेळी लंके यांनी किरण काळे आणि शहर काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांचा शाही थाटात सत्कार केला. राज्यात काँग्रेस -राष्ट्रवादी शिवसेनसह एकत्र सत्तेत आहे. सर्वसामान्य माणसांचे प्रश्न सोडवण्यासाठी काम केल्यास सामान्य माणसाचे प्रेम हे नक्कीच मिळत असते. समाज सेवा हेच खरे राजकारणाचे मुख्य उद्दिष्ट ठेवून नेतृत्वाने काम करायचे असते. किरण काळे यांचे काम चांगले असून समाजाभिमुख आहे असे प्रतिपादन करत आ. लंके यांनी यावेळी काळे यांना भावी राजकीय वाटचालीससाठी शुभेच्छा दिल्या.

 

 

यावेळी किरण काळे यांनी आ.लंके यांनी कोरोना संकट काळात शरदचंद्र पवार आरोग्य केंद्राच्या माध्यमातून कोरोनाग्रस्तांसाठी केलेल्या कार्याचा गौरव केला. स्व. अनिलभैय्या राठोड यांच्या प्रमाणेच पारनेर विधानसभा मतदारसंघांमध्ये आ.लंके हे सर्वसामान्य माणसाच्या गळ्यातले ताईत बनले आहेत. चोवीस तास उपलब्ध असणारा आणि तत्परतेने मदतीला धावून येणारा आमदार म्हणून लंके यांनी अल्पावधीमध्ये लौकिक मिळविला आहे, असे काळे म्हणाले.कोरोना संकट काळात नगरकर नागरिकांना नगर शहरात बेड उपलब्ध होत नसताना नगरकरांना आ. लंके यांनी त्यांच्या कोवीड सेंटरमध्ये बेड उपलब्ध करून दिले,याबद्दल काळे यांनी लंके यांचे यावेळी आभार मानले. शहराची स्थिती गंभीर असताना नगर शहराच्या मदतीसाठी पारनेर धावून आले याबद्दल काळे यांनी यावेळी आ.लंके यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. कोरोना काळात लंके यांनी केलेल्या कामाबद्दल यावेळी अहमदनगर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने काळे यांच्या हस्ते लंके यांचा सत्कार करून गौरव करण्यात आला.

 

 

 

हे ही पहा आणि सबस्क्राईब करा. 

 

 

 

या भेटीदरम्यान आमदार निलेश लंके आणि काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्यामध्ये सुमारे पंधरा मिनिटे बंद दाराआड चर्चा झाली. विखे जगताप यांची सहमती एक्सप्रेस सुरू असताना लंके-काळे यांच्या मध्ये बंद दाराआड झालेल्या चर्चेचा तपशील समजू शकला नसला तरी राजकीय धुरिणांच्या भुवया मात्र उंचावल्या आहेत. नगर दक्षिणेच्या राजकारणात जगताप हे उघडपणे विखे यांच्या बरोबर असल्याचे पाहायला मिळत असताना काळे हे लंके यांच्या समवेत दिसू लागल्यामुळे हा नगर शहरात चर्चेचा विषय झाला आहे.यावेळी काळे यांच्या समवेत आ. लंके यांनी ब्लॉक काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मनोज गुंदेचा, शहर जिल्हा उपाध्यक्ष खलील सय्यद, शहर जिल्हा उपाध्यक्ष अनंतराव गारदे, नगर तालुका युवक काँग्रेस अध्यक्ष ॲड. अक्षय कुलट, शहर क्रीडा काँग्रेस अध्यक्ष प्रवीणभैय्या गीते पाटील, विद्यार्थी काँग्रेस तालुकाध्यक्ष सुजित जगताप यांचा देखील सत्कार केला.