बालदिनानिमित्त अहिल्यानगरमध्ये माझी शाळा बालविवाह मुक्त शाळा अभियानाचे होणार उद्घाटन

स्नेहालयच्या उडान बालविवाह प्रतिबंधक प्रकल्पाचा पुढाकार

नगर (प्रतिनिधी)- बालहक्क आणि सुरक्षिततेसाठी पुढाकार घेत, अहिल्यानगर मधील स्नेहालयच्या उडान बालविवाह प्रतिबंधक प्रकल्पाने गुरुवारी (दि.14 नोव्हेंबर) बालदिनाचे औचित्य साधून माझी शाळा बालविवाह मुक्त शाळा या अभियानाचे उद्घाटन आयोजित केले आहे. जिल्हा शिक्षणाधिकारी यांच्या हस्ते होणारे हे उद्घाटन, जिल्ह्यातील सर्व शाळांना बालविवाह मुक्त करण्याच्या दिशेने एक महत्वाकांक्षी उपक्रम ठरणार आहे. या उपक्रमात मराठी पत्रकार परिषद, बालभवन, जिल्हा महिला व बाल विकास विभाग आणि रेडिओ नगर (90.4 एफ.एम.) यांचे सहकार्य लाभले आहे.
पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती 14 नोव्हेंबर रोजी बालदिन म्हणून साजरी केली जाणार आहे. बालदिन हा लहान मुलांच्या हक्कांचा जागर, त्यांचे संरक्षण व प्रगती साधण्यासाठी प्रेरणादायी दिवस मानला जातो. चाचा नेहरू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नेहरूंना मुलांवर असलेले विशेष प्रेम आणि त्यांना शिक्षण व समान हक्क मिळवून देण्याचा उद्देश घेऊन उडान प्रकल्पाने प्रत्येक शाळेला बालविवाह मुक्त करण्याचा निर्धार केला आहे.
या अभियानाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना त्यांच्या हक्कांबद्दल जागरूक करून, त्यांच्या उज्ज्वल भविष्याची दिशा ठरवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. या विशेष कार्यक्रमात विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी भाषणे, सांस्कृतिक कार्यक्रम आणि बालविवाह प्रतिबंधाबाबत जनजागृतीचे सत्र असेल. विद्यार्थ्यांना त्यांच्या हक्कांचे महत्त्व पटवून दिले जाईल व समाजातील बालविवाहाच्या दुष्परिणामांवर चर्चा केली जाणार असल्याचे उडान प्रकल्पाच्या मानद संचालक ॲड. बागेश्री जरंडीकर यांनी सांगितले.
जिल्ह्यातील बालविवाह समस्येला आळा घालण्यासाठी एक सकारात्मक पाऊल उचलले जाणार आहे. यामुळे मुलांना सुरक्षित आणि स्वतंत्र जीवनाची संधी मिळेल, तसेच त्यांच्या उज्वल भविष्याची हमी मिळण्यासाठी या उपक्रमातून प्रयत्न केले जाणार आहे.