न्यू आर्ट्स महाविद्यालयात आविष्कार विभागीय संशोधन स्पर्धा संपन्न
नगर- न्यू आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स कॉलेज (स्वायत्त) अ.नगर येथे ‘आविष्कार २०२४ विभागीय संशोधन स्पर्धा संपन्न झाली. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात २००६ पासून महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या संशोधन वृतीला चालना देण्यासाठी आविष्कार, अन्वेषण, इनोव्हेशन, परिषदा यासारखे उपक्रम राबविले जातात. याद्वारे विद्यार्थ्यांमधून उद्योजक व संशोधक निर्माण करण्याच्या दृष्टीने तसेच सहभागी विद्यार्थ्यांना विद्यापीठातील सायन्स आणि इनोव्हेशन पार्क, इन्कुबेशन सेंटर व एस्पायर यासारख्या संशोधन प्रोत्साहन योजनांशी जोडणे शक्य होते.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने आविष्कार विभागीय स्पर्धेकरीता अ.नगर जिल्ह्यातील विविध २४ महाविद्यालयातील संशोधक विद्यार्थ्यांचे सुमारे १७० प्रकल्प सादरीकरणासाठी २८० विद्यार्थी न्यू आर्ट्स महाविद्यालयात पाठविले. महाविद्यालयाने त्याकरिता उत्कृष्ट नियोजन करून आविष्कार स्पर्धेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या संशोधक वृतीला, नाविन्यपूर्ण संशोधन प्रकल्पांना चालना दिली हि खूप गौरवाची व अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे. यामधून ग्रामीण आणि शहरी विद्यार्थ्यांना आपले संशोधन विचार मांडण्याची सुवर्णसंधी मिळाली.
परीक्षक म्हणून अॅग्रिकल्चर व अॅनिमल हजबंडरी या कॅटेगरीसाठी सोनई महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शंकर लावरे, मानद वन्यजीव संरक्षक प्रो. डॉ. सुधाकर कुऱ्हाडे, फार्मसी व मेडिसिन कॅटेगरीसाठी विखे पाटील महाविद्यालयाचे प्रो. डॉ. रमेश सावंत, सोनई महाविद्यालयाचे प्रो. डॉ. रामदास पांढरे, इंजिनीअरिंग व टेक्नॉलजी कॅटेगरीसाठी छत्रपती शिवाजी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्रो. डॉ. ए. बी. काळे, विखे पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाचे पी. आर. एस. तांबे यांनी काम पहिले. याप्रसंगी वाणिज्य व व्यवस्थापन विभागाचे उपप्राचार्य डॉ. संजय कळमकर, विज्ञान विभागाचे उपप्राचार्य डॉ. अनिल आठरे, कला विभागाचे समन्वयक प्रो. डॉ. किसन अंबाडे, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वय डॉ. अनंता हरकळ, समन्वयक डॉ. आनंद पंडित, विविध विभागांचे विभागप्रमुख, सहकारी प्राध्यापक, प्रबंधक, अधीक्षक आणि अनेक संशोधक विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयातील अनेक प्राध्यापक, समिती सदस्य, प्रशासकीय कर्मचारी यांनी खूप मेहनत घेतली.