पोलीस भरती प्रक्रिया पुढे ढकला : खा. लंके

राज्य सरकार 19 जून पासून पोलीस भरती प्रक्रिया राबवत आहे. सध्या पावसाळा सुरू असल्याने ही भरती प्रक्रिया पुढे ढकलण्याची मागणी खासदार निलेश लंके यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र पाठवून केली आहे. चाचणी परीक्षा घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी खासदार लंके यांची भेट घेऊन ही भरती प्रक्रिया पुढे करण्याची मागणी केली होती. उमेदवारांची मागणीची दखल घेऊन लंके यांनी मुख्यमंत्री शिंदे यांना पत्र पाठवून उमेदवारांच्या अडचणींकडे त्यांचे लक्ष वेधले आहे .लंके यांनी पाठवलेल्या पत्रात, सध्या पावसाळा सुरू असून पाऊस झाल्यानंतर पोलीस भरती प्रक्रिया मैदानी चाचणीवर त्याचा परिणाम होऊ शकतो. पावसामुळे चिखल झालेल्या मैदानावर चाचणी देणे त्यांना कठीण जाणार असल्याचे लंके यांनी पत्रात म्हटले आहे चाचणीच्या दिवशी अचानक पाऊस सुरू होऊन भरती प्रक्रिया प्रभावीत झाल्यास त्याचा परिणाम वर्षानुवर्ष भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांवर होणार आहे. पावसात भिजल्याने भरतीसाठी आलेले तरुण आजारी पडू शकतात. याचा विचार करून भरती चाचणी प्रक्रिया पुढे ढकलण्याची उमेदवारांची मागणी आहे. या मागणीचा विचार करून ही प्रक्रिया पुढे ढकलण्याचा विचार करण्याची विनंती लंके यांनी केली आहे.