प्रा. किसन चव्हाण यांच्या ‘आंदकोळ’ चा सोलापूर विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात समावेश.

नगर मधील सी.एस.आर.डी. महाविद्यालयात 'आंदकोळ' वर परिसंवादाचे आयोजन

अहमदनगर (ऋषिकेश राऊत)

                           वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष प्रा. किसन चव्हाण यांच्या ‘आंदकोळ’  या आत्मकथनाचा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या बी.ए. च्या मराठी विषयाच्या दलित साहित्य अंतर्गत अभ्यासक्रमात समावेश करण्यात आला आहे.

                             विद्यापीठाच्या मराठी अभ्यास मंडळाच्या बैठकीत सर्वानुमते ही निवड करण्यात आली असल्याचे पत्र मराठी विभाग प्रमुख प्रा. डॉ. देविदास गायकवाड यांनी प्रा. चव्हाण यांना पाठविले आहे. प्रा. किसन चव्हाण यांनी परिवर्तनाची भूमिका घेऊन आपण जगलेले, भोगलेले अनुभव ‘आंदकोळ‘ या आत्मकथनातून परखडपणे मांडून दलित साहित्याचा प्रवास समृद्ध केला आहे.

                                 ग्रंथाली प्रकाशन तर्फे २०१५ मध्ये ‘आंदकोळ’ या आत्मकथनाची पहिली आवृत्तीचे तर २०१६ मध्ये दुसरी आवृत्ती प्रकाशित झाली आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे पूर्व अध्यक्ष उत्तम कांबळे यांनी या आत्मकथनाची पाठराखण केली असून ख्यातनाम समीक्षक व डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील मराठी विभाग प्रमुख प्रसिद्ध लेखक प्रा. डॉ. प्रल्हाद लुलेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत नगर मधील सी.एस.आर.डी. महाविद्यालयात ‘आंदकोळ’ वर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते.

हे ही पहा आणि सब्सक्राईब करा

                                            या आत्मकथनास अनेक प्रतिष्ठेचे पुरस्कार प्राप्त झाले आहेत. प्रा. किसन चव्हाण हे आदिवासी वर्गाचे प्रतिनिधी असून आदिवासी बोलीभाषेत ‘आंदकोळ’ या शब्दाचा अर्थ ‘वादळ’ असा होतो. आंदकोळ हे आदिवासी समाज व्यवस्थेची चिरफाड करणारे एक भेदक भाष्य आहे. पुरोगामी, परिवर्तनवाडी, आंबेडकरी चळवळीतील एका विद्रोही व आक्रमक कार्यकर्त्यांच्या जीवनातील झंझावाती वादळाची ही कहाणी आहे. आदिवासींच्या वाट्याला आलेले दुःख, दारिद्र्य, वेदना, भोगवटा,  तसेच त्यांचे हक्क, अधिकार व समाजातील न्यायासाठी दिलेला लढा यात रोमांचकारी पध्दतीने मांडण्यात आला आहे. धर्म आणि जाती व्यवस्थेशी विद्रोह पुकारण्याऱ्या एका बंडखोर कार्यकर्त्यांचे हे आत्मकथन अनेकांना प्रेरणादायी ठरणारे आहे. म्हणूनच त्याचा सोलापूर विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात समावेश झाला आहे. याबद्दल वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक मा. खा. अॅड. प्रकाश आंबेडकर, जेष्ठ संपादक व साहित्यिक तथा माजी संमेलनाध्यक्ष उत्तम कांबळे, प्रसिद्ध समिक्षक प्रा. डॉ. प्रल्हाद लुलेकर यांनी अभिनंदन केले आहे.