लसीकरण केंद्रावर नागरिकांची होणारी हेळसांड थांबवा
जीवनधारा प्रतिष्ठानच्या वतीने आयुक्तांना निवेदन
लसीकरण केंद्रावर नागरिकांना चुकीच्या सुचना देऊन घरी पाठवत असल्याचा आरोप जीवनधारा प्रतिष्ठानचे अध्यक्ष अमोल लगड यांनी केला आहे. तर लसीकरण केंद्रावर नागरिकांची होणारी हेळसांड थांबवून सर्वसामान्यांचे कोरोना लसीकरण करण्याची मागणी महापालिका आयुक्तांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
नागपूर आरोग्य केंद्रावर लसीकरणसाठी आलेल्या नागरिकांना आरोग्य कर्मचारी वर्ग चुकीच्या सूचना सांगत आहे. यामुळे नागरिक केंद्रावरून निघून जातात. नागरिक केंद्रावरून घरी गेल्यावर काही ठराविक लोकांना दुपारी तीन वाजल्याच्या नंतर फोन करून बोलावून लस दिली जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. दुपारनंतर ठरावीक नागरिकांना होत असलेल्या लसीकरणाबाबत कर्मचारी वर्गाला विचारणा केली असता, वरिष्ठांकडून सूचना मिळाल्यानंतर त्यांच्या सांगण्यावरुन लसीकरण करावे लागत असल्याचे ते सांगत आहे. यामुळे सर्वसामान्यांना वेगळी वागणुक व काही मंडळींना व्हीआयपी वागणुक दिली जात आहे. हा प्रकार त्वरीत थांबवून सर्वसामान्यांचे प्राधान्याने लसीकरण करण्याची मागणी जीवनधारा प्रतिष्ठानचे अध्यक्ष अमोल लगड यांनी केली आहे. आयुक्तांनी सदर विषयी मनपा आरोग्य अधिकारी यांना खुलासा करण्याच्या सूचना केल्या. हा प्रश्न लवकर न सुटल्यास महापालिका आरोग्य अधिकार्यांच्या दालनात ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा लगड यांनी दिला आहे.
लसीकरण केंद्रावरील गर्दी कमी करण्यासाठी आरोग्य कर्मचारी वर्ग नागरीकांना खोट्या सूचना करतात. नोकरदार वर्गाला रोज सकाळी जाऊन सात-आठ दिवस लस मिळत नाही. दुपारनंतर लस काही लोकांसाठी राखीव ठेवली जाते. राजकीय व्यक्तींचा लसीकरणात मोठा हस्तक्षेप असल्याने गोंधळ उडत आहे. काही औद्योगिक कंपन्यामध्ये लसीकरण झाले नसेल तर पगार देण्यावर निर्बंध घालण्यात आले आहे. यामुळे कामगार वर्ग मोठ्या प्रमाणात लस घेण्यासाठी गर्दी करत आहे. लसीकरणासाठी महापालिकेने योग्य नियोजन करण्याची आवश्यकता आहे. -अमोल लगड (अध्यक्ष, जीवनधारा प्रतिष्ठान)