मंत्री गडाखांविरोधात “वंचित”चा रस्ता रोको……

डीएसपी चौकात वाहतूक कोंडी

अहमदनगर

(प्रतिनिधी संस्कृती रासने)

वंचित बहुजन आघाडीचे नेते संजय लक्ष्‍मण सुखदान यांच्यावर राजकीय द्वेषातून शिवसेनेचे मंत्री शंकरराव गडाख हे अन्याय करत असल्याचा आरोप करत वंचित बहुजन आघाडीने आज पोलिस अधीक्षक चौकात रास्ता रोको आंदोलन केले. आंदोलनात सहभागी झालेल्या वंचितच्या नेत्यांनी मंत्री गडाख यांच्यावर जोरदार टीका केली. आंदोलनादरम्यान झालेल्या भाषणातून वंचितच्या नेत्यांनी प्रशांत गडाख यांच्या पत्नी गौरी यांच्या तसेच प्रशांत गडाख यांचे खासगी स्वीय सहायक प्रतीक काळे यांच्या मृत्यूची चौकशीची मागणी केली. नेवासा तालुक्यात वंचित बहुजन आघाडीचे नेते संजय सुखदान काम करत असल्याने राजकीय द्वेषातून मंत्री त्यांना त्रास देत आहेत.

 

 

 

मंत्री गडाख यांच्याकडून सुखदान त्यांच्याविरोधात खोटा गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न करत आहे. मंत्री गडाख यांनी पदाचा गैरवापर करून सुखदान यांच्या कुटुंबावर दडपण आणत असल्याचा निषेध यावेळी करण्यात आला. भाषणानंतर वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी पोलिस अधीक्षक चौकामध्ये साडेबारा वाजता रास्ता रोको आंदोलन केले. यावेळी मोठा पोलिस बंदोबस्त होता. कार्यकर्त्यांनी रास्ता रोको केल्यामुळे औरंगाबाद, मनमाड, पुणे रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली होती. आंदोलनात संगमनेर, औरंगाबाद, नेवासे व अहमदनगर शहरातील बहुसंख्य कार्यकर्ते सहभागी झाले होते. मंत्री गडाख यांच्या विरोधात यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. घोषणाबाजी मध्ये महिला होत्या. तोफखाना पोलीस ठाण्याच्या पोलिस निरीक्षक ज्योती गडकरी, कॅम्पचे सहायक निरीक्षक शिशिरकुमार देशमुख, शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक राजेंद्र भोसले यांच्या नेतृत्वाखाली पोलिस बंदोबस्त होता. वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रतिक बारसे, संजय सुखदान, योगेश साठे, फिरोज पठाण, संजय जगताप, जीवन पारधे, अमर निर्भवणे, भाऊ साळवे यांनी आंदोलनाचे नेतृत्व केले.