शहरात सुभाषचंद्र मित्र मंडळाने साकारला व्यसन एक विनाश! हा जिवंत देखावा
व्यसनामुळे युवकांचे जीवन उध्वस्त होत आहे -आ. संग्राम जगताप
अहमदनगर (प्रतिनिधी)- व्यसनाचे दुष्परिणाम दर्शवून नागरिकांमध्ये व्यसनमुक्तीच्या जागृतीसाठी शहरातील जुना बाजार रोड येथील सुभाषचंद्र मित्र मंडळाच्या वतीने गणेशोत्सवानिमित्त व्यसन एक विनाश! हा जिवंत देखावा साकारण्यात आला आहे. या देखाव्याचे उद्घाटन आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते झाले. यावेळी मंडळाचे अध्यक्ष पै. उमेश निस्ताने, उपाध्यक्ष शिवा जंगम, प्रदीप राऊत, महेश निस्ताने, महेश हीवाळे, विनोद निस्ताने, करण फसले, सागर वणारसे, सागर शिंदे आदी उपस्थित होते.
आमदार संग्राम जगताप म्हणाले की, व्यसनामुळे युवकांचे जीवन उध्वस्त होत आहे. व्यसन फक्त अमली पदार्थाचे नसून, एखाद्या वस्तूची सवय लागणे हे देखील गंभीर व्यसन आहे. भावी पिढीच्या भवितव्यासाठी त्यांना व्यसनमुक्तीसाठी प्रोत्साहित करण्याची गरज आहे. व्यसनांपासून युवकांना वाचविण्यासाठी समाजात जागृती करण्याची नितांत गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रारंभी आमदार जगताप यांच्या हस्ते श्री गणेशाची आरती करुन देखाव्याचे उद्घाटन करण्यात आले. या देखाव्यात कलाकार विविध व्यसनांपासून आरोग्यावर होणारे दुष्परिणाम व उध्वस्त होणारा प्रपंच यावर नाटिका सादर करत आहेत.