देशपातळीवर दखल घेण्याएवढे फिनिक्सचे सामाजिक कार्य -आ. संग्राम जगताप

फिनिक्स फाऊंडेशनच्या मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीरास ज्येष्ठ नागरिकांचा प्रतिसाद 417 गरजूंची मोफत नेत्र तपासणी

अहमदनगर (वैष्णवी घोडके)

फिनिक्स फाऊंडेशनने गरजू घटकांसाठी आरोग्य सेवेचे महायज्ञ अविरतपणे सुरु ठेवले. मागील वीस ते पंचवीस वर्षापासून दृष्टीदोष असलेल्या सर्वसामान्य घटकांवर मोफत उपाचर करण्यासाठी फाऊंडेशनचे कार्य सुरु आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यातून शिबीरासाठी नागरिक येऊन लाभ घेतात. लाखोंच्या संख्येने दृष्टीहीनांना नवदृष्टी देण्याचे काम करण्यात आले. तर कोरोनाच्या संकटकाळात देखील गरजू घटकांसाठी शिबीर घेण्यात आले. निस्वार्थ भावनेची फिनिक्सची सामाजिक चळवळ दिशादर्शक असून, देशपातळीवर दखल घेण्याएवढे सामाजिक कार्य उभे केल्याची भावना आमदार संग्राम जगताप यांनी व्यक्त केली.

 

 

 फिनिक्स सोशल फाऊंडेशनच्या वतीने नागरदेवळे (ता. नगर) येथे मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीर घेण्यात आले. शिबीराच्या उद्घाटनप्रसंगी आमदार जगताप बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपमहापौर गणेश भोसले, फिनिक्स फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष जालिंदर बोरुडे, वैभव दानवे, बाबासाहेब धीवर, किरण कवडे, राजेंद्र बोरुडे, ह.भ.प. देवतरसे महाराज, बाबूराव दळवी, विष्णूपंत गवळी, डॉ. आनंद छाजेड, राहुल भोजने, डॉ. वैभव देशमुख, आरोग्य सेविका सोनाली घाडगे, सुनिता कड आदी उपस्थित होते.

 

 

 

हे ही पहा आणि सब्सक्राईब करा.

 

उपमहापौर गणेश भोसले म्हणाले की, फिनिक्स फाऊंडेशनच्या माध्यमातून जालिंदर बोरुडे यांनी स्वत:ला सामाजिक कार्यात वाहून घेतले आहे. जात, धर्म, पंथ या गोष्टींना थारा न देता माणुसकीच्या भावनेने सर्व समाजातील गरजू घटकांना शिबीराच्या माध्यमातून आधार दिला जात आहे. सामाजिक क्षेत्रात फिनिक्सची भरारी अभिमानास्पद असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रास्ताविकात जालिंदर बोरुडे यांनी फिनिक्स फाऊंडेशन दृष्टीदोष असलेल्या वंचित घटकातील रुग्णांची मागील 26 वर्षापासून सेवा करीत आहे. अनेक गरजू रुग्णांना आधार देण्याचे कार्य सुरु असून, कोरोनानंतर सर्वसामान्यांची गरज ओळखून हे शिबीर अविरत सुरु ठेवण्यात आले आहे. महागडी उपचार पध्दती सर्वसामान्यांच्या अवाक्याबाहेरची गोष्ट असून, या शिबीराच्या माध्यमातून दर्जेदार सेवा पुरविण्यात येत आहे. नेत्रदान व अवयवदान चळवळीत देखील फाऊंडेशनचे योगदान सुरु असून, अनेक दृष्टीहीनांना नेत्रदानाच्या माध्यमातून नवदृष्टी मिळाली असल्याचे त्यांनी सांगितले.

 

 

 

गावातील संत सावता महाराज मंदिर येथे घेण्यात आलेल्या या शिबीरात 417 रुग्णांची मोफत नेत्र तपासणी करण्यात आली. डॉ. वैष्णवी जरबंडी, आर्यन कराळे व किरण कवडे यांनी रुग्णांची तपासणी केली. 68 गरजू रुग्णांवर मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. यावेळी गरजूंना अल्प दरात मोफत नंबरचे चष्मे वाटप करण्यात आले. तसेच शिबीरार्थींची मोफत आरटीपीसीआर कोरोना चाचणी, मधुमेह व रक्तदाब तपासणी करण्यात आली.
कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर गर्दी न करता शासनाच्या नियमांचे पालन करुन हे शिबीर घेण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैभव दानवे यांनी केले. पाहुण्यांचे स्वागत सौरभ बोरुडे व गौरव बोरुडे यांनी केले. आभार राजेंद्र बोरुडे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी फिनिक्स फाऊंडेशनचे सदस्य व ग्रामस्थांनी परिश्रम घेतले.