गाव रोगमुक्त होण्यासाठी सार्वजनिक स्वच्छता गरजेची -सरपंच प्रियंका लामखडे

नेहरू युवा केंद्र व श्री नवनाथ युवा मंडळाच्या वतीने निंबळकला स्वच्छता अभियान

अहमदनगर (वैष्णवी घोडके)

गाव रोगमुक्त होण्यासाठी सार्वजनिक स्वच्छता गरजेची आहे. अस्वच्छतेने साथीचे आजार पसरत असल्याने नागरिकांनी घराबरोबरच परिसरातील स्वच्छतेला महत्त्व देण्याची गरज निर्माण झाली आहे. कोरोनाच्या संकटकाळात सर्वांना स्वच्छतेचे महत्त्व पटले असून, त्या दिशेने वाटचाल करण्याची गरज आहे. गावे स्वच्छ व कचरामुक्त झाल्यास ग्रामस्थांना निरोगी व प्रसन्न वातावरण मिळणार असल्याची भावना निंबळकच्या सरपंच प्रियंका लामखडे यांनी व्यक्त केली.

 

 

 

 

नेहरू युवा केंद्र व श्री नवनाथ युवा मंडळाच्या वतीने स्वच्छता पंधरवडा अंतर्गत निंबळक (ता. नगर) येथे स्वच्छता अभियान राबवून ग्रामस्थांमध्ये सार्वजनिक स्वच्छतेबद्दल जनजागृती करण्यात आली. यावेळी अध्यक्षीय भाषणात सरपंच लामखडे बोलत होत्या. गावातील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मारक येथे पुष्पहार अर्पण करुन स्वच्छता अभियानाचे प्रारंभ करण्यात आले. यावेळी गाव परिसरात स्वच्छता करण्यात आली. या अभियानात निमगाव वाघाचे माजी सरपंच साहेबराव बोडखे, ग्रामपंचायत सदस्य पै. नाना डोंगरे, सामाजिक कार्यकर्ते दत्तू उर्फ राजू रोकडे, सोसायटीचे संचालक भाऊराव गायकवाड, अमोल अडागळे, बंटी वैराळ, युवा मंडळाचे अध्यक्ष संदिप डोंगरे, सचिव प्रतिभा डोंगरे आदी सहभागी झाले होते.

 

 

 

हे ही पहा आणि सब्सक्राईब करा.

 

 

पै. नाना डोंगरे म्हणाले की, निरोगी आरोग्यासाठी स्वच्छता पाळणे आवश्यक आहे. स्वच्छतेची सुरुवात स्वतःपासून केल्यास बदल घडणार आहे. स्वच्छ भारताचे स्वप्न साकारण्यासाठी प्रत्येकाचे योगदान महत्त्वाचे आहे. गाव हे आपले घर समजून वागल्यास घाण व कचरा होणार नाही. स्वच्छतेने अनेक आजार टाळता येऊ शकणार असल्याचे त्यांनी सांगून स्वच्छतेचे महत्त्व सांगितले. गाव परिसरात उपस्थितांनी हातात झाडू घेऊन परिसर स्वच्छ केला. ग्रामस्थांनी देखील या उपक्रमात सहभाग नोंदवून आपला परिसर स्वच्छ ठेवण्याचा संकल्प व्यक्त केला. या कार्यक्रमासाठी नेहरु युवा केंद्राचे जिल्हा युवा समन्वयक शिवाजी खरात यांचे मार्गदर्शन लाभले.