माजी सैनिकांना राजकीय आरक्षण मिळावे

जय हिंद सैनिक सेवा फाउंडेशनची मागणी

आजी-माजी सैनिकांचे विविध प्रश्‍न सोडविण्यासाठी माजी सैनिकांना राजकीय आरक्षण देण्याच्या मागणीचे निवेदन जय हिंद सैनिक सेवा फाउंडेशनच्या वतीने राज्यव्यापी महाप्रबोधन यात्रेतील राष्ट्रवादी माजी सैनिक सेलच्या राज्य पदाधिकार्‍यांना देण्यात आले. तर या प्रश्‍नावर माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी मध्यस्थी करुन केंद्र व राज्य सरकारकडे माजी सैनिकांच्या राजकीय आरक्षणाची भूमिका मांडण्याचे निवेदन देण्यात आले.

माजी सैनिकांना राजकीय आरक्षण मिळण्यासाठी जय हिंद सैनिक सेवा फाउंडेशन सातत्याने पाठपुरावा करत आहे.आजी-माजी सैनिकांचे, शहीद परिवाराचे प्रश्‍न सोडवण्यासाठी सैनिकांना राजकीय आरक्षण मिळणे गरजेचे आहे. त्यांच्या माध्यमातून विकासाचे नवीन पर्व राज्याला व देशाला मिळेल. प्रामाणिकपणे देशाची सेवा करणारे सैनिक राजकीय क्षेत्रामध्ये आरक्षण मिळाल्यास आपल्या गावाचा, तालुक्याचा व जिल्ह्याचा चेहरामोहरा बदलून राज्याच्या विकासाला एक नवीन दिशा देणार असल्याचे संघटनेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.

ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगर पालिका, महापालिका, विधानसभा, लोकसभा व राज्यसभेत एक सदस्य तसेच शिक्षक मतदार संघाप्रमाणे महाराष्ट्र राज्यात सात विभागांमध्ये सात सैनिक मतदार संघ निर्माण करण्याची गरज आहे. आजी-माजी सैनिकांचे प्रश्‍न सोडवण्यासाठी मतदारसंघाची रचना करून सात सैनिक आमदार व्हावेत व राज्यपाल नियुक्त करुन १२ आमदारांमध्ये एका माजी सैनिकाला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने एक माजी सैनिक आमदार करण्याचे निवेदनात म्हंटले आहे.

शहरात आलेल्या राज्यव्यापी महाप्रबोधन यात्रेतील राष्ट्रवादी सैनिक सेलचे प्रदेशाध्यक्ष दीपक शिर्के, सरचिटणीस बाबासाहेब जाधव, प्रदेश संघटक वसंत अजमाने यांना जय हिंद सैनिक सेवा फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष शिवाजी पालवे यांनी दिले. यावेळी शिवाजी गर्जे, अशोक मुठे, बाबासाहेब घुले, गिरीश पवार, संतोष शिंदे, राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा. माणिक विधाते, त्रिदल संघटनेचे सूर्यनारायण आठरे, तय्यब बेग, चंद्रकांत ढेंबरे, मनसुख वाबळे, युवराज गांगवे, हनुमंत गांगवे, सदाशिव भांडकर, चंद्रकांत ठोंबरे, शहाजी जाधव, मेजर शिरीष पवार, जिल्हाध्यक्ष पांडुरंग शिरसाठ आदी उपस्थित होते.