रस्ता खोदाईसाठी मनपाकडून १०७६३ रुपयांपर्यंत दर प्रस्तावित

शहरात गॅस पाईपलाईन, मोबाईल कंपन्यांच्या ऑप्टिकल फायबर केबल व इतर कारणांसाठी रस्ता खोदकाम करण्यासाठी नव्याने दर निश्चितीचा प्रस्ताव म.न.पा प्रशासनाने सादर केला आहे. डांबरी रस्ता, काँक्रिटचा, रस्ता पेपर ब्लॉक अशा विविध प्रकारच्या रस्त्यांसाठी स्वतंत्र दर प्रस्तावित करण्यात आले आहेत. प्रति रनिंग मीटर साठी किमान ७२८९ ते १०७६३ रुपयांपर्यंत खुदायी शुल्क व एक हजार रुपये प्रति किलोमीटर प्रशासकीय शुल्क असे दर प्रस्तावित करण्यात आले आहेत. आज बुधवारी होणाऱ्या स्थायी समितीच्या बैठकीत यावर निर्णय होणार आहे. शहरात मोबाईल कंपन्यांच्या केबल साठी तसेच गॅस पाईपलाईन साठी मोठ्या प्रमाणात खोदाई सुरू आहेत. यापूर्वी महापालिकेने तत्कालीन महासभेच्या ठरावानुसार २००० रुपये प्रति रनिंग मीटर दराने खोदाई शुल्क आकारले होते. गॅस पाईपलाईन साठी आलेल्या खोदाईमुळे रस्त्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याने स्थायी समितीने काही महिन्यांपूर्वीच प्रति रनिंग मीटर १५००० रुपये याप्रमाणे खोदाई शुल्क आकारण्याचे आदेश दिले होते. मात्र या आदेशानंतर मोबाईल कंपन्या व गॅस कंपन्यांकडून शुल्क भरण्यास असमर्थता दर्शवण्यात आली. दरम्यानच्या काळात राज्य शासनाने खोदायी शुल्क आकारणी संदर्भात महापालिकेला निर्देश दिले आहेत. त्यानुसार प्रशासनाने नव्याने दर प्रस्तावित करून स्थायी समितीकडे प्रस्ताव सादर केला आहे. स्थायी समितीच्या मंजुरीनंतर मोबाईल कंपन्या व गॅस कंपन्यांना या नवीन दराद्वारे शुल्क भरण्यासाठी प्रस्ताव दिला जाणार आहे.