राम मंदिराच्या पुजाऱ्यांचा पोशाख आता पिवळा

अयोध्या येथील रामलल्ला मंदिरातील पुजाऱ्यांच्या पोशाखाचा भगवा रंग बदलून पिवळा करण्यात आला असून, त्यांना मंदिरात मोबाईल फोन देण्यास बंदी घालण्यात आली आहे. असे मंदिर ट्रस्टच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. आतापर्यंत गर्भगृहातील पुजारी भगव्या कपड्यात दिसत होते. ते भगवे फेटे, भगवा कुर्ता आणि धोतर घालायचे. आता पुजारी पितांबर, पिवळ्या रंगाचा कुर्ता आणि त्याच रंगाची पगडी परिधान करू लागले आहेत. मंदिर अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा नवा ड्रेसकोड एक जुलैपासून लागू करण्यात आलेला आहे. नवीन पुरोहितांना पिवळ्या रंगाचे फेटे बांधण्याचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. मंदिरात मुख्य पुजाऱ्यासह चार सहाय्यक पुजारी सध्या आहेत.