जिल्ह्यात मागासवर्गीयांवर अन्याय अत्याचार रोखण्यासाठी कठोर कारवाई करण्याची मागणी

केडगावला मागासवर्गीय कुटुंबीयांना मारहाण व शिवीगाळ प्रकरणी आरोपींवर अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करावा आरपीआय युवक आघाडीचे जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन

प्रतिनिधी (वैष्णवी घोडके)

केडगाव येथे मागासवर्गीय कुटुंबातील ज्येष्ठ महिला व दिव्यांग मुलीस मारहाण करुन जातीवाचक शिवीगाळ करणार्‍यांवर अ‍ॅट्रॉसिटी अ‍ॅक्ट प्रमाणे गुन्हा दाखल करण्याची मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या युवक आघाडीच्या (गवई गट) वतीने करण्यात आली. या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी कार्यालयात देण्यात आले. यावेळी युवक जिल्हाध्यक्ष पवन भिंगारदिवे, शहर जिल्हाध्यक्ष सुशांत म्हस्के, संतोष पाडळे, भिम वाघचौरे, दिनेश पाडळे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

 

 

 

 

 

केडगाव येथे 12 ऑगस्ट रोजी पहाटे शिवबाई अमृते या ज्येष्ठ महिला व त्यांची दिव्यांग मुलीस पाणी सांडण्यावरुन ढवळे कुटुंबीयांशी वादावादी झाली. ढवळे कुटुंबातील सदस्यांनी अमृते व त्यांच्या मुलीस मारहाण करुन जातीवाचक शिवीगाळ केली असल्याचा आरोप पिडीत कुटुंबीयांनी केला आहे. सदर प्रकरणी कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केली असता सुनील ढवळे, अक्षय ढवळे व संगीता ढवळे यांच्यावर शिवीगाळ प्रकरणी अदखलपात्र गुन्हा नोंदविण्यात आला.

 

 

 

हे ही पहा आणि सब्सक्राईब करा.

 

 

 

 

 

अमृते कुटुंबीय मागासवर्गीय व दुर्बल घटकातील असल्याने त्यांना जातीय कारणातून वारंवार मानसिक त्रास दिला जात आहे. जिल्ह्यात मागासवर्गीयांवर अन्याय अत्याचार वाढत असताना अशा घटना रोखण्यासाठी आरोपींवर त्वरीत अ‍ॅट्रॉसिटी अ‍ॅक्ट प्रमाणे गुन्हे दाखल करुन कठोर कारवाई करण्याची मागणी आरपीआयने केली आहे. सदर प्रकरणी आरोपींवर अ‍ॅट्रॉसिटी अ‍ॅक्ट प्रमाणे गुन्हे दाखल होऊन पिडीत कुटुंबीयांना न्याय न मिळाल्यास उपोषण करण्याचा इशारा आरपीआय युवक आघाडीच्या वतीने देण्यात आला आहे.