स्मायलिंग अस्मिता कष्टकरी शेतकरी विद्यार्थी संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन
पारनेर येथील महिला तहसीलदार अडचणीत आल्यावर मराठा असल्याची आठवण येते का - यशवंत तोडमल
प्रतिनिधी (वैष्णवी घोडके)
पारनेर येथील महिला तहसीलदाराच्या ऑडिओ क्लिप चे प्रकरण सध्या राज्यभर गाजत असल्याने त्या क्लिप मध्ये उल्लेख आहे की आपण मराठा असल्याने त्रास दिला जात आहे त्यामुळे जातीय वाद पसरवण्याचे काम प्रशासनाने करू नये या मागणीसाठी स्मायलिंग अस्मिता कष्टकरी शेतकरी विद्यार्थी संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय येथे निवेदन देण्यात आले.
यावेळी संघटनेचे कार्याध्यक्ष यशवंत तोडमल समवेत शुभम मिसाळ, विकी रोहकले, महेश कांबळे, संभाजी कदम, स्वप्नील चव्हाण आदी पदाधिकारी उपस्थित होते. आमच्यातीलच अनेक विद्यार्थी आता सरकारी उच्च पदावर कार्यरत आहेत.आम्ही मराठा आरक्षणावर आणि मराठा विद्यार्थ्यांसाठी मोठी आंदोलने केली आहे आणि त्यातून विद्यार्थ्यांना न्याय मिळवून दिला आहे.पण आम्ही सर्व जण सर्व जातीच्या विद्यार्थ्यांसाठी नेहमीच कृतीशील पध्दतीने मदतीला धावून जातो.
सध्या आपल्या प्रशासनातील अधिकारी हे जातीच्या आधारावर स्वतावरील भ्रष्टाचाराचे आरोप फेटाळत आहे.प्रशासकीय अधिकारी हे पदावर कार्यरत असतात तेव्हा त्यांना कुठलीही जात नसते, तशी त्यांनी शपथ घेतलेली असते. मात्र, अनेकदा अडचणीत सापडल्यावर त्यांना जात आठवते. जातीच्या आधारे सहानुभूती मिळविण्याचा प्रयत्न केला जातो. अशा अधिकाऱ्यांनी इतरवेळी जातीसाठी आपले योगदान काय, याचा विचार करावा. मराठा युवक आता सुशिक्षित आणि जाणकार झाल्याने असे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत.पारनेर येथील महिला तहसीलदाराच्या ऑडिओ क्लीपचे प्रकरण सध्या राज्यात गाजते आहे. या क्लीपमध्ये उल्लेख आहे की ‘आपण मराठा असल्याने त्रास दिला जात आहे.’
प्रशासकीय काम करताना अधिकाऱ्यांना जातीपातीच्या बाहेर जाऊन काम करणे अपेक्षित असते. तरीही कायद्याच्या व नियमांच्या चौकटीत राहून उपेक्षितांना, अडलेल्यांना, विद्यार्थ्यांना न्याय देण्याचे काम हे अधिकारी करू शकतात. याशिवाय वैयक्तिक पातळीवरही आपण ज्या समाजातून आलो आहोत, त्यांच्यासाठी काम करणारे बोटावर मोजता येतील इतकेच अधिकारी आहेत. मराठा
समाजातील युवकांसाठी काम करणा-यांचा आम्हाला अभिमानच आहे. मात्र, असे अनेक अधिकारी आहेत की ज्यांना स्वत: अडचणीत आल्यानंतरच समाजाची आठवण होते. आपण मराठा असल्याने त्रास होत असल्याचे ते सांगू लागतात. प्रत्यक्षात त्यांचा मराठा असल्याचा समाजाला काय फायदा झालेला असतो? त्यांना सहानुभूती तरी कशी मिळणार? यातील काही अधिकाऱ्यांचा तर अतिशय वाईट अनुभव आलेला असतो. अडलेले विद्यार्थी, नडलेले शेतकरी, नोकदार जेव्हा या अधिकाऱ्यांकडे काम घेऊन जातात, त्यावेळी चौकटीत राहून मदत करण्याचे औदार्यही हे अधिकारी दाखवत नाही. समाजातील युवकांना दिलासा आणि प्रोत्साहन देणे दूरच उलट त्यांची उपेक्षा, हेटाळणीच करतात. अशा वेळी याच मराठ्यांची आपल्या अडचणीच्या काळात साथ मिळेल, अशी अपेक्षा तरी हे कशाच्या जोरावर करतात, हा खरा प्रश्न आहे.
त्यामुळे अशा प्रकारांना आता मराठा समाज आणि युवक बळी पडणार नाहीत. कोणीही अशी कोरडी सहानुभूती मिळविण्याचा प्रयत्न करू नये, असं आमचं सांगण आहे. मध्यंतरी जिल्हा क्रीडा अधिकारी गवांदे ताईंच्या समर्थनार्थ आम्ही विद्यार्थी व पालकांनी रस्त्यावर उतरून महाराष्ट्र शासनाचा विरोध केला होता कारण प्रशासनात गवांदे ताईंचे काम अतिशय विद्यार्थी प्रिय शेतकरी कुटुंबातील विद्यार्थ्यांसाठी न्यायाचे होते परंतु पारनेर तहसीलच्या बाबतीतच आम्ही नेहमीच दुःखी आहोत. उत्पन्नाचा दाखला सुद्धा विद्यार्थ्यांना वेळेवर मिळत आहे की नाही या बाबतीत तहसीलदार जागृक वाटल्या नाही.आम्ही मुंबई मातोश्रीवर मोर्चा काढला होता तेव्हा साधी पाण्याची बाटली घेऊन कुठलाही अधिकारी आमची विचारपूस करायला आला नाही.मग अधिकारी लोकांना स्वतावर संकट आले की जात आठवते हेच आम्हाला मान्य नाही. जर कुणाला जातीचे काम करायचे असेल तर त्यांनी प्रथम आपल्या पदाचा राजीनामा दिला पाहिजे अशी मागणी निवेदनाद्वारे स्मायलिंग अस्मिता कष्टकरी शेतकरी विद्यार्थी संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय येथे करण्यात आली.