मुरूम उत्खननप्रकरणी अरुण मुंढे विरुद्ध कारवाई करा
अन्यथा शेतकऱ्यांचे दि.११ डिसेंबरपासून तहसीलसमोर उपोषण
शेवगाव,(प्रतिनिधी) – तालुक्यातील पिंगेवाडीतील वाळू प्रकरणानंतर मुंढे बंधूविरोधात शेतकऱ्याने वारंवार तहसीलदारांना निवेदन देऊनही कारवाई झाली नाही, तसेच गुन्हाही दाखल होत नसल्याने तहसील कार्यालयासमोर उपोषणाला बसण्याचा इशारा दिला आहे.
या संदर्भात तालुक्यातील चेडेचांदगाव येथील शेतकरी चंद्रकांत सखाराम चेडे व त्यांच्या इतर बंधूनी दि. ५ व २१ सप्टेंबर, तसेच दि. ३ नोव्हेंबरला तहसीलदारांना तक्रार अर्ज देऊनही कारवाई होत नसल्याने, त्याने ११ डिसेंबर रोजी तहसील कार्यालयासमोर उपोषणाला बसणार असल्याचा इशारा निवेदनातून दिला आहे.
चेडे यांनी निवेदनात म्हटले आहे की, वारंवार निवेदन देऊनही अद्यापपर्यंत कोणतीही कारवाई झाली नाही. गट नंबर २८ मधून माझ्या जमिनीतून मुरूम चोरून नेला आहे. आमच्या जमिनीचे उत्खनन झाल्यामुळे उपासमारीची वेळ आली आहे. हे उत्खनन करून कॉन्ट्रॅक्टर अरुण भाऊसाहेब मुंढे व उदय भाऊसाहेब मुंढे या दोघांनी दमदाटी करून जेसीबी व वाहनांच्या साहाय्याने मुरूम चोरून नेला आहे.मात्र, अद्याप कार्यवाही झालेली नाही.
दि. १७ ऑक्टोबर रोजी मंडलाधिकारी, तलाठी, तसेच सार्वजनिक विभाग यांनी संयुक्त पंचनामा करून अहवाल दाखल केल्याचे निवेदनात म्हटले असून, या संदर्भात त्वरित कारवाई झाली नाही, तर पालकमंत्री तथा महसूलमंत्र्यांच्या दारापुढे गुरेढोरे व बायका-मुलांसह उपोषणास बसण्याचा इशारा चंद्रकांत चेडे यांच्यासह अन्य सहा शेतकर्यांनी १८ सप्टेंबर २३ रोजी देण्यात आला होता.
तरीही अद्याप कारवाई झाली नसल्याने ११ डिसेंबरला चेडे यांनी तहसील कार्यालयासमोर उपोषणास बसण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. मुंढे प्रकरणामुळे भाजप अडचणी येण्याची शक्यता आहे.