सरकारी शाळा म्हटलं की कच्च्या इमारती, तुटलेले बेंच, अस्वच्छ वर्ग, व्यवस्थित न शिकविणारे शिक्षक असे चित्र नजरेसमोर येते. त्यामुळेच, पालकांचा ओढा खासगी शाळांकडे असतो. मात्र, याला छेद देत मध्य प्रदेशातील रतलाम येथील सरकारी शाळेने जागतिक सर्वोत्कृष्ट शाळा – २०२४ या प्रतिष्ठित पुरस्काराच्या नावीन्यपूर्ण श्रेणीत अंतिम तीन शाळांत स्थान पटकाविले आहे. यापैकी एका शाळेची पुरस्कारासाठी अंतिम निवड होईल.
लंडनमधील ‘टी ४ एज्युकेशन’कडून हा पुरस्कार दिला जातो. सर्वसमावेशक व उच्च दर्जाच्या शिक्षणासाठी मध्य प्रदेश सरकारने ‘सीएम राईज स्कूल्स’ सुरू केल्या आहे. रतलाममधील विनोबा सीएम राईज स्कूल हीही त्यापैकीच एक. या शाळेने जागतिक पुरस्कारांच्या स्पर्धेत अंतिम तीन शाळांमध्ये स्थान पटकाविल्याबद्दल मध्य प्रदेशचे शालेय शिक्षणमंत्री उदयप्रताप सिंह यांनी शाळेचे अभिनंदन केले आहे. त्याचप्रमाणे, जागतिक स्तरावर ओळख मिळविल्याबद्दल सूक्ष्म,लघु आणि मध्यम उद्योगमंत्री चैतन्य कश्यप यांनीही आज शाळेला भेट देत शिक्षक, विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. हा पुरस्कार दहा हजार डॉलरचा आहे.
रतलाममधील आंबेडकर नगरमधील झोपडपट्ट्यांत १९९१ मध्ये या शाळेची स्थापना झाली. सुरुवातीला विद्यार्थ्यांची संख्या कमी असणारी ही शाळा सीएम राईज स्कूलमध्ये श्रेणीसुधारित झाली. त्यानंतर शाळेत शिक्षकांना अध्ययनासाठी ऑनलाइन साहित्य उपलब्ध करून देण्यात आले. शिक्षकांनी वर्गात शिकविताना त्याचा वापर केला. विद्यार्थ्यांच्या उपस्थितीसाठी गुगल फॉर्म्सचा वापर केला जातो. त्याचप्रमाणे शिक्षक पालकांशीही आभासी पद्धतीने जोडले गेले आहेत.
Prev Post
Next Post