भर रस्त्यावर थांबणार्‍या खासगी लक्झरी बसेसवर कारवाई करा

कोठला येथील राज चेंबर्ससमोर भर रस्त्यावर थांबणार्‍या खासगी लक्झरी बसेसमुळे वाहतुक कोंडीचा नागरिकांना नेहमी त्रास सहन करावा लागत असून, अपघातालाही निमंत्रण मिळत आहे. त्यामुळे याठिकाणी थांबणार्‍या खासगी लक्झरी बसेसवर कारवाई करण्याची मागणी स्थानिक नागरिकांच्या वतीने अन्सार सय्यद यांनी उप प्रादेशिक परिवहन अधिकारी उर्मिला पवार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

दीड महिन्यापूर्वी सदर मागणीचे निवेदन शहर वाहतुक शाखेला देखील देण्यात आले होते. परंतु अपेक्षित कारवाई होत नसल्याने भर रस्त्यावर उभ्या असणारे खाजगी बसेसवर उप प्रादेशिक परिवहन कार्यालय व शहर वाहतुक शाखेच्या वतीने संयुक्त कारवाई करण्याची मागणी करण्यात आलेली आहे.

काही लक्झरी बसेस तर चुकीच्या दिशेने उभ्या असतात. या उभ्या असलेल्या खासगी बसेसमुळे भविष्यात एखादा मोठा अपघात होण्याची शक्यता आहे. यामुळे त्वरीत या प्रश्‍नाकडे गांभीर्याने लक्ष देऊन कोठला येथील राज चेंबर्स समोर भर चौकात व रस्त्यावर थांबणार्‍या खासगी लक्झरी बसेसवर कठोर कारवाई करावी अशी  मागणी स्थानिक नागरिकांच्या वतीने करण्यात आली आहे.