धर्मवीर ग्रामीण सार्वजनिक वाचनालयास आदर्श ग्रंथालय पुरस्कार

सोलापूरात झालेल्या ग्रामीण मराठी साहित्य संमेलनात नगरच्या वाचनालयाची दखल

अहमदनगर (प्रतिनिधी)- श्री नागनाथ देवस्थान ट्रस्ट व कवी फुलचंद नागटिळक प्रतिष्ठानच्या वतीने धर्मवीर ग्रामीण सार्वजनिक वाचनालयास आदर्श ग्रंथालय पुरस्कार प्रदान करण्यात आला. सोलापूर येथील पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापिठाचे सहाय्यक कुलसचिव डॉ. शिवाजी शिंदे यांच्या हस्ते वाचनालयाचे अध्यक्ष पै. नाना डोंगरे यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
वीसावे ग्रामीण मराठी साहित्य संमेलन खैराव ता. म्हाडा (जि. सोलापूर) येथे पार पडले. यावेळी ग्रामीण भागात वाचन संस्कृती रुजविणाऱ्या वाचनालयास पुरस्कार प्रदान करण्यात आले. यावेळी सिने अभिनेते फुलचंद नागटिळक, भारत सरकारचा राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त मनोज कदम, कवी संमेलनाचे अध्यक्ष स्मिता पाटील, प्राचार्य सुभाष नागटिळक, अनिल पाटील आदी उपस्थित होते.
धर्मवीर ग्रामीण सार्वजनिक वाचनालयाच्या माध्यमातून पै. नाना डोंगरे यांनी निमगाव वाघा (ता. नगर) येथे चार काव्य संमेनल घेवून नवोदीत कवींना प्रोत्साहन देण्याचे कार्य केले. तर विद्यार्थ्यांसाठी निबंध, काव्य लेखन, वक्तृत्व स्पर्धा व चित्रकला स्पर्धा घेवून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्याचे काम ते करत आहे. ग्रामीण भागात वाचन संस्कृती रुजविण्यासाठी विद्यार्थ्यांना विविध पुस्तकांसह स्पर्धा परीक्षांचे पुस्तके देखील वाचनालयाच्या माध्यमातून ते उपलब्ध करुन देत आहे. या कार्याची दखल घेऊन वाचनालयास आदर्श ग्रंथालय पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.