शहरात रंगला मेकअप टॅलेंट शो

मेकअप आर्टिस्टने खुलविले पारंपारिक वेशभुषेतील वधू मॉडेल्सचे सौंदर्य

अहमदनगर (प्रतिनिधी)- येथील अहिल्या फाउंडेशन व अहिल्या मेकओव्हरच्या वतीने शहरात मेकअप टॅलेंट शो रंगला होता. महिलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी महिला दिनाचे औचित्य साधून या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मेकअप आर्टिस्ट युवती व महिलांनी विविध पारंपारिक वधूंच्या वेशभुषेतील युवतींचे सौंदर्य मेकअपद्वारे खुलवून आपल्या कलागुणांचे सादरीकरण केले.
युवतींना मेकअपचे व्यावसायिक प्रशिक्षण देण्याच्या उद्देशाने अहिल्या फाउंडेशनच्या अध्यक्षा कावेरी कैदके यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम पार पडला. या टॅलेंट शोमध्ये मेकअप आर्टिस्ट यांनी आपल्या मॉडेल्सना वधूंच्या पारंपारिक वेशभुषेत सजविल्या होत्या. वधूंच्या वेशभुषेत वधूंनी रॅम्प वॉक करून विविध कलागुण सादर केले. नृत्य, अभिनयासह विविध कलेचे सादरीकरण केले. यामध्ये मोठ्या संख्येने युवती व महिलांनी सहभाग नोंदवला.
सध्या फॅशनचे युग असून मेकअप आर्टिस्टला चांगली मागणी आहे. युवतींना करिअरच्या दृष्टीकोनाने या क्षेत्रात उत्तम संधी आहे. महिलांना आर्थिक सक्षम करण्यासाठी अहिल्या फाउंडेशन व अहिल्या मेकओव्हरच्या माध्यमातून कार्य सुरु असल्याचे कावेरी कैदके यांनी सांगितले.