सुनील सकट यांना शासनाचा लोकशाहीर आण्णाभाऊ साठे पुरस्कार प्रदान

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पुरस्काराचे वितरण

अहमदनगर (प्रतिनिधी)- सामाजिक न्याय विभाग व विशेष सहाय्य विभाग महाराष्ट्र शासनाच्या वतीने सामाजिक कार्यकर्ते सुनील भिमराव सकट यांना राज्यस्तरीय साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे पुरस्काराने मुंबईत गौरविण्यात आले.
नरिमन पॉइंट मुंबई येथील नॅशनल सेंटर फॉर परफॉर्मिंग आर्ट्स (एनसीपीए) जमशेदजी बाबा नाट्यगृहात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये झालेल्या या शासनाच्या पुरस्कार वितरण सोहळ्याप्रसंगी सामाजिक न्याय विभागाचे सचिव सुमित भांगे यांच्या हस्ते सकट यांनी सपत्निक पुरस्कार स्विकारला.
सुनील सकट यांचे विविध क्षेत्रात सामाजिक कार्य सुरु आहे. वंचित, दीन-दुबळ्यांना आधार देऊन ते दिव्यांग, ज्येष्ठ नागरिक यांच्या हितासाठी विविध उपक्रम राबवित असतात. समाजातील विविध प्रलंबीत प्रश्‍नांचा शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करत आहेत. तर शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ दुर्बल घटकांना मिळवून देण्यासाठी ते कार्य करत आहे. त्यांनी राबविलेले स्वच्छता मोहीम, रक्तदान, वृक्षरोपण, मोफत शालेय साहित्याचे वाटप, कोरोना महामारीतील योगदान आदी सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांना शासनाच्या वतीने साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.