शेतजमीन बळकाविण्याच्या विरोधात काळी आई ताबा पडताळणी आंदोलन जारी

सरकारी अधिकारी व पोलीसांना हाताशी धरुन वर्षानुवर्षे ताब्यात असलेली शेतजमीन न्यायालयाच्या हुकूमाशिवाय ताबा मिळवण्याचा प्रयत्न होत असताना अजमपूर (ता. संगमनेर) येथे पीपल्स हेल्पलाईनच्या पुढाकाराने ग्रामस्थ व स्थानिक शेतकर्‍यांच्या उपस्थितीमध्ये 7 मे रोजी ‘ काळी आई ताबा पडताळणी आंदोलन’ केले जाणार असल्याची माहिती संघटनेचे निमंत्रक अ‍ॅड. कारभारी गवळी यांनी दिली. तर या आंदोलनाच्या माध्यमातून शेत जमीन बळकाविण्यासाठी सुरु असलेली अनागोंदी हाणून पाडली जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

अजमपूर (ता. संगमनेर) येथे पूर्वीचा सर्वे नंबर 86 मधील 6 हेक्टर 73 शेतजमीन आहे. यामध्ये अहिलाजी कांदळकर यांच्या ताब्यात 1 हेक्टर 10 आर, रुंजा कांदळकर यांच्या ताब्यात 1 हेक्टर 96 आर तर गंगाराम रामा वगैरे 5 लोकांच्या ताब्यात 3 हेक्टर 67 आर जमीन दक्षिण उत्तर पट्ट्यांमध्ये कसली जाते.

चाळीस वर्षांपूर्वी गटाची योजना लागली, पण आपसात कोणीही ताबे दिले नाही. दक्षिणेकडील भाग डोंगराळ व उत्तरेकडील भाग बागायती असल्याचा फायदा गंगाराम रामा कांदळकर यांनी घेण्याच्या भूमिकेतून संगमनेरची भूमी अभिलेख आणि ग्रामीण पोलिसांची मदत घेऊन नसलेले उत्तरेकडचा भाग ताब्यात घेण्यासाठी व 40 वर्षानंतर गटाप्रमाणे ताबा मिळवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. त्यामुळे अहिलाजी कांदळकर आणि रुंजा कांदळकर या दोन शेतकर्‍यांना मोठी भीती निर्माण झाली आहे. यामुळे त्यांच्या उत्पन्नाचे साधन हिरावण्याचा प्रयत्न केला जात असताना संघटनेच्या माध्यमातून काळी आई ताबा पडताळणी आंदोलन जारी करण्यात आले आहे.

या आंदोलनाची नोटीस राज्य सरकारसह पोलीस अधीक्षक, जिल्हा भूमी अभिलेख, संगमनेर तहसिलदार व पोलीस स्टेशनला देण्यात आली आहे. स्थानिक शेतकर्‍यांच्या उपस्थितीत अनेक वर्षापासून जमीनीवर ताबा कोणाचा व कोण जमीन कसतो? हे सिध्द केले जाणार आहे. गावातील अनेक शेतकर्‍यांनी या ताबा पडताळणीला मान्यता दिली आहे. सुप्रीम कोर्टाच्या अनेक निकालांमध्ये वर्षानुवर्षी ताब्यात असलेल्या जमिनी कोर्टाच्या हुकूमनाम्याशिवाय काढून घेता येत नाही. तर पोलिसांना खाजगी जमिनीच्या वादात निवडा करण्याचा अधिकार नसताना पदाचा दुरोपयोग करुन दिवसाढवळ्या सरकारी अधिकारी सर्वसामान्य शेतकर्‍यांची फसवणुक करत असल्याचे अ‍ॅड. गवळी यांनी म्हंटले आहे.