अ.भा.म. नाटय परिषद, मुंबईचा विशेष पुरस्कार

स्व.रितेश साळुंके यांच्या कुटुंबीयांना प्रदान.

मुंबई- अखिल भारतीय मराठी नाटय परिषद मध्यवर्ती, मुंबईच्या वतीने विशेष कार्यकर्ता पुरस्कार स्व.रितेश साळुंके यांना नाट्यसंमेलनाध्यक्ष डॉ. जब्बार पटेल, जेष्ठ अभिनेते अशोक सराफ, अभिनेते मोहन जोशी, अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी, अशोक हांडे, कोषाध्यक्ष सतीश लोटके, नाट्य परिषदेचे अध्यक्ष अभिनेते प्रशांत दामले यांच्या प्रमुख उपस्थितीत स्वर्गीय रितेश साळुंके यांच्या पत्नी सपना सांळुके व कन्या समिक्षा साळुंके यांना प्रदान करण्यात आला.
नाटय परिषदेच्या माध्यमातून हौशी रंगभूमीवर कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यास सदरचा पुरस्कार दिला जातो. स्व. रितेश साळुंके यांनी अहमदनगर जिल्ह्यातील व महाराष्ट्रातील हौशी रंगभूमीवर मोलाचे कार्य केले आहे.स्व. साळुंके यांनी नगर मधील रंगकर्मी प्रतिष्ठानचे अध्यक्ष म्हणून अनेक वर्षे एकांकिका, नाटके सादर केली आहेत. अनेक कलाकार त्यांच्या संस्थेतून नावारूपाला आले आहेत. उत्तम अभिनेते, लेखक, दिग्दर्शक आणि कार्यकर्ते म्हणून ते महाराष्ट्रभर परिचित होते. नाटय शास्त्राचा पदवी अभ्यासक्रम त्यांनी पूर्ण केला होता. शालेय जीवनापासून त्यांनी बीडच्या परिवर्तन प्रतिष्ठान या नाट्यसंस्थेच्या माध्यमातून रंगभूमीवर काम करायला सुरुवात केली होती.
राज्य नाटय स्पर्धा,स्वागताध्यक्ष करंडक, अक्षर करंडक एकांकिका स्पर्धा तसेच जिल्ह्यात आणि ग्रामीण भागात होणाऱ्या स्पर्धांना त्यांचे मोठे सहकार्य मिळाले आहे. समिक्षक, परीक्षक, आयोजक तसेच स्पर्धा प्रमुख म्हणून त्यांनी नगरच्या रंगभूमीला मोठे योगदान दिले आहे. नगर येथे संपन्न झालेल्या ८३ व्या नाटय संमेलनात त्यांनी महत्वपूर्ण जबाबदारी पार पाडली. राज्यात दरवर्षी होणाऱ्या विविध ठिकाणच्या नाटय संमेलनात त्यांनी सक्रीयपणे कार्य केले आहे. हौशी रंगभूमीवर राज्यात होणाऱ्या विविध उपक्रमांचा ते अभ्यास करीत असत. मुंबई येथे संपन्न झालेल्या पुरस्कार सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून खा. शरद पवार, उद्योग मंत्री ना. उदय सामंत व नाट्य क्षेत्रातील अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.
स्व. रितेश सांळुके यांच्या स्मरणार्थ नाट्य परिषद, नगर शाखा लवकरच उपक्रमांचे आयोजन करणार असल्याची भावना नाट्य परिषद, मुंबईचे कोषाध्यक्ष सतीश लोटके व नगर शाखेचे अध्यक्ष अमोल खोले अशी व्यक्त केली.
स्व.रितेश साळुंके यांच्या कार्याची दखल घेत नाटय परिषद मध्यवर्ती मुंबईने त्यांच्या कार्याचा गौरव करून स्व. रितेश साळुंके यांना न्याय दिला अशी भावना नगर शाखेचे अध्यक्ष अमोल खोले, उपाध्यक्ष शशिकांत नजान, नियामक मंडळ सदस्य क्षितीज झावरे, प्रा. संजयकुमार दळवी यांनी व्यक्त केल्या.