निमगाव वाघात विद्यार्थी, पालक व शिक्षकांना पोस्को कायद्याबद्दल माहिती

लहान मुला-मुलींवर वाढते अत्याचार रोखण्यासाठी पालकांसह मुलांमध्ये जागृती आवश्‍यक -ॲड. मनीषा केळगंद्रे

अहमदनगर (प्रतिनिधी)- स्वातंत्र्यपूर्व काळात महिलांची परिस्थिती दयनीय होती. समाज सुधारक व महापुरुषांनी महिलांच्या हक्कावर कार्य केले. राज्यघटनेने महिलांना समानतेचा अधिकार मिळाला, मात्र इतर पाश्‍चात्य देशात महिलांना अधिकारासाठी संघर्ष करावा लागला. देशात लहान मुला-मुलींवर वाढते अत्याचार रोखण्यासाठी पालकांसह मुलांमध्ये जागृती आवश्‍यक आहे. लहान मुलांवरील लैंगिक अन्याय अत्याचार प्रतिबंध करण्यासाठी पोस्को कायदा अमलात आला असून, या कायद्याची पालक, शिक्षकांना माहिती होणे गरजेचे असल्याची भावना विशेष सरकारी वकील ॲड. मनीषा केळगंद्रे-शिंदे यांनी व्यक्त केली.
निमगाव वाघा (ता. नगर) येथील नवनाथ विद्यालयात नेहरु युवा केंद्र, श्री नवनाथ युवा मंडळ व स्व.पै. किसनराव डोंगरे बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने मुला-मुलींवर होणारे लैंगिक अन्याय अत्याचार रोखण्यासाठी जनजागृतीवर आयोजित करण्यात आलेल्या व्याख्यानात ॲड. केळगंद्रे-शिंदे बोलत होत्या. यावेळी माजी सरपंच साहेबराव बोडखे, डोंगरे संस्थेचे अध्यक्ष पै. नाना डोंगरे, मुख्याध्यापक उत्तम कांडेकर, भागचंद जाधव, वर्षा औटी, शांता नरवडे, तृप्ती वाघमारे, युवा मंडळाच्या अध्यक्ष पै. संदीप डोंगरे, सचिव प्रतिभा डोंगरे, अमोल वाबळे, तेजस केदारे, मयुरी जाधव, प्रमोद थिटे, सविता तवले आदींसह शालेय शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पुढे ॲड. केळगंद्रे-शिंदे म्हणाल्या की, महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांचा महिला सक्षमीकरणाचा वारसा भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी पुढे चालवला. घटनेमुळे महिलांना अनेक अधिकार प्राप्त झाल्याचे स्पष्ट केले. तर लहान मुला-मुलींना त्यांनी चांगला स्पर्श व वाईट स्पर्श याबद्दल माहिती देवून, पोस्को कायद्याबद्दल सांगितले.
प्रारंभी नारी शक्ती तंदुरुस्ती दौड मध्ये मुली धावल्या. या दौड मधून महिला सशक्तीकरणाचा संदेश देण्यात आला. यावेळी महिला शिक्षकांचा सन्मान करण्यात आला. प्रास्ताविक मुख्याध्यापक उत्तम कांडेकर यांनी केले. पै. नाना डोंगरे म्हणाले की, समाज घडविण्याचे कार्य महिला करत आहे. प्रत्येक क्षेत्रात महिला आघाडीवर असून, युवतींनी आपल्या सदृढ आरोग्यासाठी व्यायामाकडे वळण्याची गरज आहे. आजची सक्षम नारीचे आरोग्य देखील तेवढेच महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमोल वाबळे यांनी केले. आभार तृप्ती वाघमारे यांनी मानले. या कार्यक्रमासाठी नेहरु युवा केंद्राचे उपनिदेशक शिवाजी खरात, रमेश गाडगे, न्यायाधार संस्थेच्या अध्यक्षा ॲड. निर्मला चौधरी यांचे मार्गदर्शन लाभले.