एमआयडीसी चा भाजी बाजार आला पुन्हा रस्त्यावर

एमआयडीसी पोलीस प्रशासन व एमआयडीसी व्यवस्थापनाने ठोस पाऊले उचलावी

अहमदनगर : मेट्रो न्यूज     

एमआयडीसी पोलीसांनी नवनागापूर, एमआयडीसी हद्दीतील नगर-मनमाड महामार्गावर बसणारे भाजी विक्रेते,  विविध खाद्य दुकाने  हटविलेले अतिक्रमण आता पुन्हा रस्त्यावर आले आहेत. विक्रेत्यांना रस्त्याच्या मागे सरकून बसविण्यासाठी भाजपा अनुसूचित जाती महिला मोर्चाच्या शहर जिल्हा उपाध्यक्षा शारदा गायकवाड व नागापूर भाजीपाला मटन मासे व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष अंतोन गायकवाड यांनी जिल्हाधिकारी कार्यालया समोर उपोषण केले होते.

या मागणीची दखल घेऊन एमआयडीसी पोलीसांनी मागील अठवड्यात कारवाई करुन रस्त्यावर आलेले भाजी विक्रेते व इतर व्यावसायिकांनी  लावलेली दुकान हटविली होती.एमआयडीसी येथील सनफार्मा चौक ते सह्याद्री चौक तसेच एमआयडीसी पोलीस स्टेशन पर्यंत रस्त्याच्या कडेला भाजी व फळ तसेच मटण- मच्छी बाजार भरत असतो. या बाजारमुळे वाहतुक कोंडी व लहान-मोठे अपघाताचे प्रमाण देखील वाढले आहे. येथे खरेदीला आलेला ग्राहक वर्ग रस्त्यावरच  वाहने लावतात आणि  गाडीवर बसल्या-बसल्याच  भाजी व इतर साहित्य खरेदी करतात. इतर नागरिकांना आपला जीव  मुठीत धरुन या भागातून जावे लागते .

या बेशिस्तीमुळे सर्वसामान्य नागरिकांना त्रास सहन करावा लागत होता. या बाजाराला शिस्त लावण्यासाठी एमआयडीसी पोलीस प्रशासन व एमआयडीसी व्यवस्थापनाने ठोस पाऊले उचलून रस्त्यावर बसणार्‍या भाजी, फळ विक्रेते व टपर्‍यांचे अतिक्रमण मागे सरकवून घेण्यासाठी मोहिम हाती घेण्याची मागणी नागापूर भाजीपाला मटन मासे व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष अंतोन गायकवाड यांनी केली आहे.