देशात मतसत्ताक संरक्षण कायदा करण्याची मागणी

भारतीय संविधानाचे कलम 326 अन्वये प्रौढ मतदारांना प्राप्त झालेल्या अधिकारांची यशस्वी अंमलबजावणी करण्यासाठी देशात मतसत्ताक संरक्षण कायदा करण्याची मागणी इंडिया अगेन्स्ट तमस स्लेव्हरी संघटनेच्या वतीने करण्यात आली असल्याची माहिती अ‍ॅड. कारभारी गवळी यांनी दिली.
गेली 72 वर्षे या देशात लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकांमध्ये प्रौढ मतदार सहभाग करत आलेले आहेत. परंतु गुट्टलबाज सत्तापेंढारींनी मतदारांना हजार पाचशे रुपये व जोंधळ्याची शपथ देऊन मतांचा काळाबाजार केला. सत्तापेंढारी जात आणि धर्माचा वापर करून मागच्या दाराने सत्ता मिळवतात. मतदार हे निवडणूक काळात फक्त प्रजासत्ताकाचे घटक म्हणून काही प्रमाणात कार्यरत असतात. इतर वेळेला सरकारच्या धोरणाबाबत बहुसंख्य मतदार हे गाफिल असतात, त्यामुळे स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतर सुद्धा कोट्यावधी लोक बेघर आहेत. शहरामध्ये झोपडपट्ट्या वाढल्या, गरिबी आणि महागाईने कळस गाठला आहे. देशात बेरोजगारी, महिलांवरील अत्याचार वाढला असून, याचे मुख्य कारण सत्तापेंढारी मागच्या दाराने सत्ता मिळवत आहेत.
सध्या ईव्हीएम घोटाळ्या बाबत देशभर चर्चा सुरू आहे. त्यामुळे देशातील मतसत्ताक लोकशाही धोक्याच्या पातळीखाली वावरत आहे. जाती धर्मामध्ये तेढ निर्माण करून व मतदारांना भावना विविश करुन सत्ता मिळवली जाते. एकंदरीत या देशात मतसत्ताक संरक्षण कायदा आणून, राबवल्याशिवाय देशातील निवडणुका पारदर्शक ठरणार नसल्याची भूमिका संघटनेच्या वतीने स्पष्ट करण्यात आली आहे.
देशातील भ्रष्टाचार, अनागोंदी, टोलवाटोलवी या सगळ्यांना शह देण्यासाठी देशातील निवडणूक पद्धतीमध्ये क्रांतिकारक बदल घडविण्याची गरज आहे. त्यासाठी मतदारांना संरक्षण आणि त्याचे मतदान गुप्त राहण्याची खात्री असली पाहिजे, त्याशिवाय मतदार हा देशाचा कर्ता करवीता आहे याची जाणीव होण्यासाठी या कायद्याची अत्यंत गरज असल्याचे अ‍ॅड. गवळी यांनी म्हंटले आहे.
हा कायदा मोडणार्‍यांना किमान सात वर्षापर्यंत श्रम कारावासाची शिक्षा करण्याची तरतूद असली पाहिजे. मतदारांना धमकाविणे, त्यांचे रेशन कार्ड, आधार कार्ड काढून घेणे, त्याशिवाय मतांसाठी टीव्ही व इतर वस्तू वाटून उमेदवार पडल्यानंतर दिलेल्या वस्तू परत घेणे अशा गोष्टी पूर्णपणे नष्ट करण्यासाठी हा कायदा प्रभावी ठरणार असल्याचे संघटनेचे म्हणणे आहे. या मागणीसाठी अ‍ॅड. कारभारी गवळी, अशोक सब्बन, वीरबहादूर प्रजापती, विठ्ठल सुरम, अशोक भोसले, डॉ. महेबुब सय्यद, सुधीर भद्रे आदी प्रयत्नशील आहेत.