पोलीस अधीक्षक कार्यालयावर धडकला जवाब दो मोर्चा

कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येला आठ वर्षे उलटून देखील आरोपींना अद्यापि शिक्षा झाली नसल्याच्या निषेधार्थ पानसरे यांच्या स्मृतीदिनी सोमवारी (दि.२० फेब्रुवारी) डावे व समविचारी पक्ष आणि संघटनांच्या वतीने जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयावर एल्गार-जवाब दो मोर्चा काढण्यात आला.

पत्रकार चौकातील शहीद भगतसिंह यांच्या पुतळ्यास स्वातंत्र्य सैनिक कॉ. पांडुरंग शिंदे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन मोर्चाची सुरुवात करण्यात आली .आंदोलकांनी लाल झेंडे व कॉ. गोविंद पानसरे यांची प्रतिमा जवाब दो! चे फलक हातात घेऊन जोरदार घोषणा दिल्या. तारकपूर मार्गे मोर्चा जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयावर धडकला. यावेळी कॉ. पानसरे यांचे मारेकरी व प्रमुख सुत्रधारांना पाठिशी घालणार्‍या केंद्र व राज्य सरकार विरोधात जोरदार निदर्शने केली. तर मोर्चाचे द्वार सभेत रुपांतर होऊन पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या आवारात ठिय्या देऊन प्रमुख वक्त्यांची भाषणे झाली. आंदोलकांनी कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्यार्‍यांना त्वरित जेरबंद करून त्यांना फाशीची शिक्षा होण्यासाठी महाराष्ट्र शासनाचे गृह खाते, त्यांच्या तपासयंत्रणांना कार्यक्षमतेने कामाला लावून न्यायालयास योग्य ते पुरावे सादर करण्याची एकमुखी मागणी केली.

आजपर्यंत तपास विशेष तपास पथकाकडे (एस.आय.टी.) होता आणि आता तो दहशवाद विरोधी पथकाकडे (ए.टी.एस.) सोपविण्यात आला आहे. आता एटीएसचे अधिकारी तपास हाती घेताच न्यायालयातच म्हणतात फरार आरोपींना शोधणे कठीण आहे. म्हणजे अशा टोलवा-टोलवी मध्ये आणखी किती वर्षे लागणार? हा प्रश्‍न डावे पक्ष व संघटनांच्या वतीने उपस्थित करुन जवाब दो आंदोलन करण्यात आले.