सावरकरांचे धगधगते देशभक्ती कार्य उलगडले गीतांच्या संगीतमय प्रवासातून

संगीतमय प्रवासात कर्मयोग, भक्तीयोग व समर्पणचे प्रतीक असलेल्या सावरकरांच्या राष्ट्रभक्तीचा हुंकार

सावेडी येथील रावसाहेब पटवर्धन स्मारक येथे स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त कालजयी सावरकर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.मित्र मेळाचे इंजि. केतन सुहास क्षीरसागर मित्र परिवाराच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी त्यांना अभिवादन करणारी राष्ट्रभक्तीची संगीत मैफल रंगली होती.

या संगीतमय प्रवासात कर्मयोग, भक्तीयोग व समर्पणचे प्रतीक असलेल्या सावरकरांच्या राष्ट्रभक्तीचा हुंकार भरला होता. संध्याकाळचे प्रसन्न वातावरणात नव पारिजात माला… शतजन्म शोधिताना… थरथरले अग्निकुंड… या गीतांनी सभागृहात गीत बहरले होते. प्रेक्षकांनी भरगच्च भरलेल्या सभागृहात टाळ्यांचा कडकडाटाने गीतांना दाद मिळत होती. ने मजसी ने परत मातृभूमीला! सागरा प्राण तळमळला… या गीतांनी अक्षरश: अंगावर शहारे आणले. जय स्तुते…. या गीताने सभागृहाचे वातावरण राष्ट्रभक्तीमय बनले होते. भारत माता की जय… वंदे मातरमच्या जयघोषाने सभागृह दणाणून निघाला. आंम्ही सकल हिंदू!… या गीतने कार्यक्रमाचा समारोप झाला. या गीतांची प्रस्तुती संस्कार भारती पश्‍चिम प्रांत अहमदनगर समितीच्या कलाकारांची होती.

आमदार संग्राम जगताप आणि  समर्थभक्त मंदारबुवा रामदासी गुरुजी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये कार्यक्रमाप्रसंगी ज्येष्ठविधीज्ञ तुकाराम चिंचणीकर, कार्यक्रमाचे आयोजक इंजि. केतन क्षीरसागर, नाट्य कलाकार श्रेणिक शिंगवी, सिने कलाकार मोहिनीराज गटणे, अभिजीत खोसे, सुमित कुलकर्णी, शिवप्रतिष्ठान हिंदूस्तानचे बापूसाहेब ठाणगे, बजरंग दलचे कुणाल भंडारी, सुधीर (राजू) मंगलारप आदी उपस्थित होते.

आमदार संग्राम जगताप म्हणाले की, त्या काळात स्वातंत्र्यवीर सावरकरांनी भावी पिढीसाठी वेदना भोगल्या. देशाच्या स्वातंत्र्याकरिता मोठा लढा उभारला. त्यांच्या प्रेरणादायी जीवनपट उलगडण्यासाठी मित्रमेळाने घेतलेला उपक्रम कौतुकास्पद असल्याचे त्यांनी सांगितले. तर प्रसिध्दी झोतात येण्यासाठी महापुरुषांबद्दल चुकीचे वक्तव्य करण्याचे काम काही जण करत आहे. स्वतःच्या टीआरपीसाठी महापुरुषांबद्दल चुकीचे बोलू नये, असा टोला सावरकरांबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणार्‍यांना त्यांनी लगावला.