१४ मार्च पासून सरकारी कर्मचारी बेमुदत संपावर

जिव्हाळ्याच्या प्रलंबित मागण्यांसाठी सरकारी , निमसरकारी,  शिक्षक -शिक्षकेतर, महापालिका, नगरपालिका ,नगरपरिषदा, नगरपंचायत कर्मचारी समन्वय समितीने १४ मार्च पासून राज्यव्यापी बेमुदत संपाची हाक दिली आहे. या पार्श्‍वभूमीवर राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघ जिल्हा शाखा अहमदनगर, समन्वय समिती व इतर संघटनांच्या मार्फत जिल्हाधिकारी सिध्दाराम सालीमठ यांना संपाची नोटीस देऊन राज्य सरकारला बेमुदत संपाचा इशारा देण्यात आला आहे.

शिक्षक शिक्षकेतर कर्मचार्‍यांच्या अनेक  मागण्या दीर्घकाळ प्रलंबित राहिल्यामुळे महाराष्ट्रातील कर्मचारी, शिक्षकांमध्ये असंतोष व संतप्त भावना असल्याचे संघटनेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.
कोरोना महामारीत शासकीय कर्मचार्‍यांनी कर्तव्यात कोणताही कसूर न करता, जनतेच्या आरोग्य व अनुषंगिक इतर विषयी अतुलनीय धैर्य दाखवून कर्तव्य पार पाडली. हे कर्मचारी केवल शाब्दिक प्रशंसेसाठी पात्र आहेत का? आपुलकी पोटी त्यांच्या जीवनाशी निगडित असलेले प्रलंबित प्रश्‍न सोडविण्याची जबाबदारी शासनाची होती.

मात्र संघटनांनी वेळोवेळी शासनाकडे केलेल्या पाठपुराव्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने कर्मचारी, शिक्षकांच्या मनात असंतोष धगधगता आहे. अन्यायग्रस्त कर्मचारी, शिक्षक नाईलाजाने शासनाविरुद्ध संघर्ष उभा करण्याच्या मनस्थितीत असल्याचे निवेदनात म्हंटले आहे.