धैर्यशील मानेंच्या पोस्टरवरील QR कोडची चर्चा, स्कॅन करताच थेट बिटकॉईन वेबसाईट ओपन

कोल्हापूर : खासदार हरवले आहेत, असे होर्डिंग मतदारसंघात झळकल्याने काही दिवसांपूर्वी चर्चेत आलेले हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे खासदार धैर्यशील माने हे आता पुन्हा त्यांच्या विकासकामाची माहिती देणाऱ्या होर्डिंगमुळे चर्चेत आले आहेत. खासदार धैर्यशील माने यांनी गेल्या ५ वर्षात आपण केलेल्या विकासकामांची आणि मतदारसंघात खेचून आणलेला निधी या संदर्भात माहिती देणारे होर्डिंग मतदारसंघात लावले आहेत. मात्र या होर्डिंगवर देण्यात आलेला क्यूआर कोड फेक असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.
येथील काही युवकांनी हा क्यूआर कोड मोबाईलवर स्कॅन केले असता, विकासकामांच्या माहिती ऐवजी वेगळीच बिटकॉइन संदर्भातील वेबसाईट उघडत असल्याचे तरुणांनी म्हटले आहे. याचे प्रात्यक्षिक केलेला व्हिडिओ सध्या सोशल मीडियामध्ये व्हायरल होत असून यामुळे या व्हिडिओवरून खासदार धैर्यशील माने आता पुन्हा ट्रोल होऊ लागले आहेत.